विकास भोसले, झी मीडिया, सातारा : महाबळेश्वर... मिनी काश्मीर अशी याची ओळख.... पावसाळा सुरू झाल्यामुळे सध्या महाबळेश्वर फुललंय... ओलं चिंब झालंय... इथले विविध पॉईन्ट्स, इथले धबधबे पर्यटकांना साद घालतायत.


लिंगमळ्याचं आकर्षण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्द झाडी... दाट धुकं...आणि मस्त बरसणारा रिमझिम पाऊस... या वातावरणाचा अनुभव घेत आपण सारं काही विसरुन जातो... पावसाळी पर्यटनाचा मुख्य भाग म्हणजे महाबळेश्वरचा प्रसिद्ध लिंगमळा धबधबा आणि लिंगमळा डोह... या काळात लिंगमळा धबधबा परिसराला भेट देणं ही पर्यटकांसाठी खास पर्वणीच असते... मुख्य लिंगमळा धबधबा, त्याच्या सुरुवातीला डोह, घनदाट डोह, घनदाट वृक्षराजीमधून जंगल भ्रमंतीचा येत असलेला सुखद अनुभव आणि सभोवतालच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ या हंगामात या धबधबा परिसराला भेट देणा-या पर्यटकांना होतेच. 


नयनरम्य दृश्यांचं वरदान


मुसळधार पावसामुळे ६०० फूट उंचीवरुन वेण्णा नदीत कोसळणारा लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागलाय. या आल्हादायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून नव्हे तर इतर राज्यातून देखील पर्यटक येऊ लागलेत. महाबळेश्वर - वाई रस्त्यालगत लिंगमळा धबधबा पर्यटकांचं खास आकर्षण आहे. पण सहजासहजी त्याचं दर्शन होत नाही... 


दोन किलोमीटर पायपीट केली की धबधब्याचं असं नयनरम्य दृष्य नजरेस पडत. निसर्गाचं वरदान असलेला लिंगमळा धबधबा तीन टप्प्यात कोसळतो... असा तीन टप्प्यात कोसळणारा हा देशातला पहिलाच धबधबा आहे. पहिला टप्पा अडीचशे फूट, दुसरा टप्पा दोनशे फूट तर तिसरा टप्पा दीडशे फूटाचा आहे. या प्रवासानंतर हा फेसाळणारा धबधबा वेण्णा आणि कृष्णा नदीत सामावतो.


एकूणच महाबळेश्वरमधील पर्यटनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळ्यात  एकदा तरी महाबळेश्वरमधल्या लिंगमळा धबधबा पहायलाच हवा...