मुंबई : चीनमधील वुहानमधून कोरोना व्हायरस जगभर पसरला. जगभरात आता कोरोनाने थैमान मांडला आहे. देशातून आता कोरोनाने वेगवेगळ्या राज्यात प्रवेश केला आहे. असं असताना महाराष्ट्रात कोरोनाने दुबईतून आलेल्या दाम्पत्यामार्फत प्रवेश केला. दुबईतून आलेल्या लोकांमार्फत कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाचे तब्बल ३९ रूग्ण सापडले असून एकाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस हा दुसऱ्या टप्प्यावर पोहोचला असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. यामुळे सरकार सावध झालं आहे. अनेक महत्वाचे निर्णय सरकारकडून आतापर्यंत घेण्यात आले आहेत. मात्र सरकार आता 'लॉक डाऊन'च्या निर्णय घेईल का? याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत. 


महाराष्ट्रात सध्या महत्वाची अंमलबजावणी करण्यात आली. यातून सदृश्य लॉक डाऊन पद्धत स्विकारली जात आहे. यामध्ये  सर्व शाळा आणि विद्यापीठांसह रेस्टॉरंट्स, बार आणि इतर अनावश्यक किरकोळ दुकानं बंद करण्यात आली आहेत. मॉल्स, जिम, जलतरण तलाव बंद केले असून, सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.


गर्दी कमी व्हावी यासाठी कलम १४४ जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. घरातून कार्यालयीन काम करणे, शक्य नसेल, तरच बाहेर पडण्याची सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. या उपाययोजना अपुऱ्या ठरल्या, तर पुढील काही काळात सार्वजनिक वाहतूकही बंद केली जाऊ शकते.


'लॉक डाऊन' म्हणजे नक्की काय? 


'लॉक डाऊन' हा पर्याय अतिशय दुर्मिळ वेळा स्विकारला जातो. यामध्ये नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे स्तलांतरीत केलं जातं किंवा घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केला जातो. हा निर्णय किती कालावधीसाठी घ्यायचा हे त्या स्थितीवर अवलंबून असतं. सध्या मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाबाबत कोणताच विचार केला नसल्याचं दिसतंय. मात्र, रुग्णांची संख्या वाढली, तर 'लॉक डाऊन महाराष्ट्रात लागू केला जाऊ शकतो. यामध्ये सर्व व्यवहार ठप्प केले जातील. वाहतूकीवर पूर्णपणे बंदी येईल. नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच राहणं गरजेचं आहे. यावेळी वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतात.