अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटला पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रवेशबंदी करण्यात आलीय. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या समितीनं हा निर्णय घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंहगड इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचे पगार थकविल्या प्रकरणी अखेर संस्थेवर ही कारवाई करण्यात आलीय. मात्र, यामुळे येथील प्राध्यापक आणि  विद्यार्थी यांचं काय? असा प्रश्न निर्माण झालाय.


एसआयसीटीईचा दणका


पुण्यातील नामवंत महाविद्यालयांपैकी एक असलेल्या सिंहगड इन्स्टिट्यूटला एसआयसीटीईने दणका दिलाय. पुढील शैक्षणिक वर्षापासून या संस्थेच्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेशबंदी करण्यात आलीय. या संस्तेच्या प्राध्यापकांचे तब्बल दीड वर्षांचे पगार थकल्याने डिसेंबरपासून प्राध्यापकांनी असहकार आंदोलन सुरू केलं होतं. संस्थेनं दिलेली आश्वासनं न पाळल्याने आणि पगार देण्यास चालढकल केल्याने प्राध्यापकांनी एआयसीटीकडे नियमभंगाची तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत तंत्र शिक्षण समितीने ही कारवाई केली.


विद्यार्थ्यांचं भवितव्य काय?


भारतीय तंत्र आणि शिक्षण परिषदेच्या या निर्णयामुळे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या तब्बल २२ अभियांत्रिकी आणि व्यवस्थापक शास्त्र महाविद्यालयांना प्रवेश बंदी करण्यात आलीय. त्यामुळे अभियांत्रिकीच्या चार हजार जागा कमी होणार आहेत. 


दुसरीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही प्राध्यापकांच्या रखडलेल्या वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी समन्वयाची भूमिका घेतलीय. या प्रकरणी सिंहगड एज्युकेशन सोसायटीला बैठकीसाठी बोलावण्यात आलं असल्याची माहिती कुलगुरूंनी दिलीय. 


गेल्या दोन महिण्यापासून विद्यार्थ्याचे लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स बंद आहेत... या विद्यार्थ्यांच्या परिक्षाही काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहे. त्यातच आलेल्या प्रवेश बंदीच्या आदेशामुळे या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.