राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा... फलित काय?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच पाच दिवसाचा झंजावाती विदर्भ दौरा केला. या विदर्भ दौऱ्यात राज ठाकरे यांनी नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्याला भेटी दिल्या. या भेटीदरम्यान मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद देखील साधला.
विदर्भात संघटनात्मक बांधणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा विदर्भ दौरा होता. मनसेच्या स्थापनेनंतर विदर्भात राज ठाकरे यांच्यावर भारावलेल्या तरुणांनी मोठ्या संख्येने मनसेत प्रवेश केला होता.
राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाने भाषणांनी विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याप्रमाणे विदर्भात ही पक्ष स्थापनेनंतर मनसेकडे तरुणाई आकर्षित झाली होती. मात्र मनसेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून विदर्भात सातत्याने संपर्क ठेवणे पक्ष कार्यकर्त्यांच्या हाती कार्यक्रम न दिल्याने संघटनात्मक बांधणीमध्ये पुरेशी लक्षणे दिल्याने गेल्या सोळा वर्षात मनसे सुरुवातीला मिळालेल्या प्रतिसादाचा तितकासा फायदा उचलू शकली नाही. त्यामुळे आज विदर्भात मनसे संघटनात्मकदृष्ट्या अतिशय कमकुवत आहे.
राज्यातलं बदललेलं राजकारण त्यात शिवसेनेची झालेली दोन शकलं या पार्श्वभूमीवर बदललेल्या राजकारणाचा अंदाज आल्याने मनसेने देखील आता राज्यभरात पक्ष संघटन मजबूत करण्याचं ठरलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात विदर्भातून केली आहे. आता इथून पुढे विदर्भात संघटनात्मक पातळीवर मागे झालेल्या चुका वगळून मनसे नवी उभारी घेण्याच्या तयारीत आहे.
यासाठीच विदर्भात येऊन राज ठाकरे यांनी विदर्भातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी वन टू वन चर्चा केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या गट तटाचे राजकारण संपवून संघटना मजबूत करून द्या प्रस्थापितांशी दोन हात करा मी तुम्हाला सत्तेत घेऊन जातो अशा पद्धतीचं कार्यकर्त्यांना ऊर्जा येईल, असे आश्वासन दिले आहे.