अमर काणे, प्रतिनिधी, झी मीडिया, नागपूर : खेळाच्या मैदानात अटीतटीच्या सामन्यात प्रचंड तणावाखाली असतानाही संयम, एकाग्रता अढळ असणे अशी धोनीची ओळख. तो येणार म्हणून नागपूरातील युवा क्रिकेटपटू चांगलेच उत्साहात होते.. तो ही अगदी उत्साहात आला. पण त्याच्या वाट्याला आणि युवा क्रिकेटपटूंच्या पदरी घोर निराशा आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटचे धडे मिळतील म्हणून नागपुरातले उदयोन्मुख क्रिकेटपटू आनंदात होते. धोनी दीडशे खेळाडूंना क्रिकेटचे धडे शिकवणार होता. पण ढिसाळ नियोजनामुळे धोनी फारच वैतागला. सकाळी साडे दहाच्या सुमाराला धोनीचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच तिथे प्रचंड गोंधळ झाला. मोबाईलवर फोटो घेणा-यांनी धडपड सुरु केली. यानंतर धोनीच्या सुरक्षिततेसाठी तैनात खाजगी सुरक्षा एजन्सीच्या बाऊन्सर्सनी लोकांना धक्काबुक्की केली. प्रचंड गोंधळामुळे मुख्य मार्गावरून न नेता गवताच्या आणि काटेरी झुडूपांमधून धोनीला व्यासपीठावर पोहोचावं लागलं. त्यामुळे धोनी पुरता वैतागला, त्यानं तसा टोलाही आयोजकांना लगावला.


मुख्य कार्यक्रमानंतर धोनी युवा क्रिकेटपटूंना मैदानावर क्रिकेटच्या टीप्स देणार होता. मात्र ढिसाळी नियोजनामुळे नाराज धोनी तिकडे फिरकलाच नाही. त्यामुळे तरुण क्रिकेटपटूंचा हिरमोड झाला. पण आयोजकांनी मात्र या सगळ्यावर सारवासारव केलीय. खरं तर या कार्यक्रमासाठी नागपूरकर क्रिकेटपटू फार उत्साहात होते. पण त्या सगळ्यावर पाणी फेरलं गेलं.