मुंबई :  राजकारणात शरद पवार हे मोठे नेते आहेत. पण ते ज्योतिषी कधी झाले माहिती  नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत या पवारांच्या वक्तव्याचा त्यांनी यावेळी समाचार घेतला. सुजयसारखा तरूण युतीत आला आहे, त्याचे स्वागत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आदीत्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्याच्या शंकेचेही निरसन केले. आदित्यला निवडणूक लढवण्याचे स्वातंत्र्य आहे, पण तो यावेळी निवडणूक लढवणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. युतीच्या उमेदवारांची यादी तयार झाली आहे, २ दिवसांत जाहीर करू असेही यावेळी उद्धव यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना -भाजप यांनी युती करत शेवटची निवडणूक ही लोकसभा 2014 मध्ये लढवली होती. त्यानंतर विधानसभा 2014, राज्यातल्या सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यामध्ये शिवसेना - भाजप हे एकमेकांविरोधात लढले होते. या दरम्यान एकमेकांवर टीकेचे टोक सेना- भाजपने गाठले होते. आता जवळपास 5 वर्षानंतर मांडीला मांडी लावून सेना - भाजप यांच्या कार्यकर्ते -पदाधिकारी यांना काम करायचे आहे. ही मानसिकता तयार व्हावी, एकत्रित प्रचार करावा ,काम करावे यासाठी हे मेळावे आयोजित केले जात आहेत.


शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच युतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्र मेळावे आयोजित केले आहेत. येत्या १५, १७ आणि १८ मार्च रोजी हे मेळावे  महाराष्ट्रात सहा वेगवेगळ्या जिल्ह्यांत होणार आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यांनंतर महाराष्ट्रातील युतीचा सर्वात मोठा महामेळावा आयोजित केला जाणार आहे. त्याची घोषणाही लवकरच केली जाईल. या बैठकीला शिवसेनेकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. तर भाजपकडून महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे नेतेदेखील उपस्थित होते. 


याशिवाय, ईशान्य मुंबईतून भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला असणारा शिवसैनिकांची विरोध, दानवे-खोतकर वाद या विषयांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. येत्या २४ तारखेला कोल्हापूरात युतीची पहिली जाहीर सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावरून प्रचाराचा नारळ फोडतील.