राणेंच्या भाजप प्रवेशावर गाव गाता गजाली...
दादांचा प्रवेशाचो मुहूर्त कधी ?, असा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चघळला जातोय.
मुंबई : दादांचा प्रवेशाचो मुहूर्त कधी ?, असा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चघळला जातोय. भाजपत कधी जाणार? या प्रश्नावर स्वतः नारायण राणे अजून काहीच बोलत नाहीयत. पण त्यानिमित्तानं अख्खं गाव वेगवेगळ्या गजाली गातंय.
राणेंनी पोराबाळांसह सामानाची बांधाबांध करुन गाठोडं भरुन ठेवलंय. पण नेमक्या कुठल्या मुहूर्तावर एसटी पकडायची याचा निर्णय काही होत नाहीय. ऐन गणेशोत्सवात राणे दशावतार दाखवणार म्हणून राजकारणातले खेळे मात्र सज्ज झालेत. केव्हा जाणार याबद्दल राणेंनी जरी चकार शब्द काढला नसला तरी गाव मात्र रोज नवी गजाल गायला लागलंय.
दादांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरत नाही, तोपर्यंत नारायण राणेंच्या समर्थकांची पंचाईत झालीय. सध्या तरी काँग्रेसचा हात खिशात घालून ठेवायचा आणि कमळ किती छान, असं म्हणण्यावाचून त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही.
राणेंसाठी मंत्रिमंडळातल्या दिग्गजांनी पायघड्या घालत स्वतःच्या खुर्च्याही रिकाम्या करायला सुरुवात केलीय. 'येवा पक्ष आपलाच असा' असं आमंत्रण चंद्रकांत पाटलांनी सावंतवाडीत जाऊन दिलंय. स्वतःचं बांधकाम सोडून राणेंसाठी पक्षातला पाया मजबूत करण्याची तयारी पाटलांनी केली.
या सगळ्या दशावतारांमध्ये शिवसेनेचा वाघ मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. कोंबड्यावर हल्ला करायचा की नाही, या विवंचनेत सध्या वाघ सापडलाय. पण याच मुद्द्यावरुन वाघानं वर्षावर जाऊन थोडीशी गुरगुरही केल्याचं समजतंय. राणेंच्या पक्षप्रवेशाची गजाल मालवणातल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगलीय.
दर वेळी मुख्यमंत्री आणि अमित शाह भेटतात ते फक्त दादांचा मुहूर्त ठरवण्यासाठीच. राणेंच्या प्रवेशावर ज्यांनी बोलायला हवं, ते नाना फडणवीस मात्र दिल्ली दरबारी राणेंबद्दल काय न्यायनिवाडा झालाय, याचा पत्ता लागू देत नाहीत. तर तिकडे काँग्रेसनं आधीच राणेंचा हात सोडून दिलाय.
मालवणातले दादांचे समर्थक जोरदार कामाला लागलेत. तुम्ही बांधाल ते तोरण आणि म्हणाल ते धोरण असे बॅनर झळकवत कार्यकर्ते ऑनलाईन कामाला लागलेत.. राणेंच्या गाववाल्यांनी वातावरण तयार केलंय. यंदाच्या गणेशोत्सवात दशावतारांचे प्रवेश कोकणात जोरदार रंगणार आहेत. त्यातला 'नारायणाच्या हाती कमळ' हा प्रवेश सगळ्यात जास्त गाजणार आहे.