पुणे : पूजा चव्हाण नावाच्या 22 वर्षांच्या तरुणीच्या आत्महत्येमुळं सध्या एकच खळबळ उडालीय. तिच्या आत्महत्येनंतर अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलं आहे.  पूजा चव्हाणनं का केली आत्महत्या? नेमकी कोण आहे पूजा चव्हाण? भरपूर पैसा, उत्तम राहणीमान असताना आत्महत्या का? असे एकना अनेक प्रश्न सध्या सर्वांनाचं पडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या 22व्या वर्षी पूजा चव्हाणने अखेरचा श्वास घेतला. ७ फेब्रुवारीला पुण्याच्या वानवडी भागातल्या इमारतीतून उडी टाकून तिनं जीवन संपवलं. तिनं आत्महत्या का केली? या तरुणीला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ही पूजा चव्हाण मूळची कुठली? ती पुण्याला राहायला का आली होती? हे प्रश्नही समोर आले आहेत. 


पूजा ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची राहणारी. ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह होती.  टिक टॉक स्टार म्हणून फेमस असलेली पूजाचा सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात देखील सक्रीय सहभाग होता. महत्त्वाचं म्हणजे, माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह शिवसेनेचे यवतमाळचे वनमंत्री संजय राठोड यांच्यासोबत तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत.



वानवडी भागातल्या याच इमारतीत पूजा चव्हाण राहत होती. काही दिवसांपूर्वीच ती बीडवरून पुण्याला आली होती. इंग्लिश स्पिकिंगचे क्लासेस करण्यासाठी आपण पुण्याला जात आहे. असं तिनं तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, अशी माहिती समोर येत आहे. 


मात्र गेल्या ७ फेब्रुवारीच्या रात्री तिनं या इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं. डोक्याला आणि मणक्याला ईजा झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला.  पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मूळची बीडची असलेली पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियात बऱ्याच चर्चा सुरू आहेत.


पूजा चव्हाण या माझ्या मतदारसंघातील तरुणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. या तरुणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून केली. बंजारा समाजाची कार्यकर्ती आणि टिक टॉक स्टार असलेल्या तरुणीचा हा मृत्यू निश्चितच वेदनादायी आहे. तिच्या मृत्यूमागचं गूढ लवकरात लवकर समोर यावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.