मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा अनेकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारा आहे. छत्रपतींच्या सोबत त्यांच्या सारखेच अनेक शूर वीर मावळे होते. जे स्वराज्यासाठी सर्वकाही झोकून देत असतं. जीव गेला तरी बेहत्तर पण स्वराज्य मिळवणारच हा बाणा उराशी बाळगत ते स्वराज्याचे रक्षण करायचे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत अनेक शूर मावळे होते. त्यापैकीच एक म्हणजे नेताजी पालकर. ते बराच काळ स्वराज्याचे सरनौबत होते. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दूसरा शिवाजी' असेही म्हटले जात होते.


नेताजी पालकर हे मूळचे पुणे जिल्ह्यातील  शिरूर गावचे होते. त्यांचा पराक्रम इतिहासात नोंद आहेत. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजलखानचा वध झाला त्या दरम्यान त्याच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजी पालकर यांचा मोठा वाटा होता. 


पण पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांचा काही वाद झाला. त्यामुळे त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले. असं म्हणतात की, त्यांनी यावेळी मुघलांची चाकरी केली होती. पण पच्छाताप झाल्यानंतर ते 9 वर्षांनी पुन्हा स्वराज्यात परतले.


पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चाल करुन गेले. आदिलशाहचा सेनापती सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापूरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला.


आदिलशाहचा किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. पण नेताजी पालकर वेळेवर पोहोचू शकले नाहीत. ज्यामुळे महाराजांना कुमक मिळाली नाही. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे हजार माणसे मारली गेली. महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले. त्यानंतर नेताजी पालकर विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघाले, त्यानंतर मिर्झाराजेंनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.


शिवाजी महाराज यांची जेव्हा आग्र्यातून औरंगजेबाच्या कैदेतून सूटका झाली. तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये असे औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दिले. त्यावेळी नेताजी पालकर मुघलाच्या छावणीत बीड नजीक धारुर येथे होते. 


24 ऑक्टोबर 1666 रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी पालकर आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. 
दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. 4 दिवसांच्या अतोनात हाल केल्यानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. 27 मार्च 1667 रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान' असे नामकरण करण्यात आले. 


जून 1667 औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर निघाले. लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे 9 वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.


छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते. त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. बाटून 9 वर्षे उलटल्यावर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. त्यानंतर त्याने 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे 1676. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. 19 जून 1676 रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.


महाराज आणि नेताजी पालकर नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई हे नेताजी नेमके कोण हे फार मोठे प्रश्णचिन्ह अजूनही आहे. 'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.