देवेंद्र फडणवीस कोणाला म्हणाले `मर्सिडीज बेबी`
`1857 च्या लढ्यात मी असेन तर तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत लढत असेन आणि तुम्ही...`
नागपूर : बाबरी मशीद आंदोलनात आपलाही सहभाग होता. तेव्हा शिवसेना (shivsena) कुठे होती? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला होता. यावर शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी टोला लगावला होता. 1857च्या लढ्यातही त्यांचं खूप योगदान आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर आता देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीज बेबी आहेत त्यांना कधी संघर्ष करावा लागला नाही आणि त्यांनी कधी संघर्ष केला आहे. त्यामुळे कारसेवकांची ते थट्टा उडवू शकतात. पण आमच्या सारख्या कारसेवकांना गर्व आहे. ज्या वेळी बाबरी ढाचा पाडला गेला, त्यावेळी मी तिथे होतो, मी नगरसेवक होतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
मी हिंदू आहे. त्यामुळे मागील जन्मावरही विश्वास आहे आणि पुर्नजन्मावरही विश्वास आहे. त्यामुळे कदाचित मागच्या जन्मात मी असेल तर 1857 च्या युद्धात तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी लढत असेन आणि तुम्ही असाल तर तुम्ही इंग्रजांशी युती केली असेल, कारण आता तुम्ही अशा लोकांशी युती केली आहे, जे 1857 ला युद्धच मानत नाहीत. जे म्हणतात ते शिपयांचं बंडं होतं, पण आम्ही त्याकडे लक्ष देत नाही असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
निवडणुकीवरुन राज्य सरकारला टोला
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. राज्य निवडणूक आयोगाने येत्या दोन आठवड्यात निवडणूक जाहीर करा असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यानी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
पाच वर्ष पूर्ण झाली आहेत आणि सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ निवडणूका प्रलंबित ठेवता येत नाही. त्यामळे अशा सर्व ठिकाणी तात्काळ निवडणुका लावण्याकरता सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. हे सरकारचं फेल्युअर आहे. दोन वर्ष सरकारने टाईमपास केला, आणि ट्रिपलटेस्ट केली नाही, त्यामुळेच अशा प्रकारचा निर्णय आला आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
कोर्टाने सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. सरकारच्या कार्यपद्धतीमुळे ओबोसींची मोठी हानी होणार आहे. या हानीला सरकारच जबाबदार आहे. योग्य भूमिका सरकारने कधीच मांडली नाही असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.