Why It Is Raining So Much In September: सोमवारी (23 सप्टेंबर) सकाळीच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस झाला. पुण्यामध्ये रात्रीपासूनच पाऊस सुरु होता. मुंबईने सोमवारी सकाळी साडेसातपर्यंत सूर्यदेवेतचं तोंडही पाहिलेलं नाही. राज्यातील या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमधील सकाळ ढगाळ वातावरणानेच झाली आहे. दुसरीकडे विदर्भामध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रातच यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाळा संपला असं समजून छत्र्या, रेनकोट घरीच ठेऊन बाहेर पडलेल्या मुंबईकरांची सकाळच्या पावसाने तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. आजच नाही तर पुढील आठवडाभर मुंबईसहीत राज्यभरामध्ये जोरदार पाऊस सांगितला आहे. अगदी शनिवारपर्यंत मुंबईकर उकाड्याने हैराण झालेले असतानाच अचानक एवढ्या पाऊस का पडत आहे? असं अचानक काय घडलं आहे की मुंबई आणि महाराष्ट्रावर ढगांची चादर तयार झाली आहे? समजून घेऊयात या सप्टेंबर रेन मागील खरं कारण...


नेमकी हवामानाची स्थिती काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवारी राज्यभराला पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर, बीड, नगर, नांदेड, हिंगोली, परभणी, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रामध्ये आजपासून मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आज (23 सप्टेंबर) मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मुंबईबरोबरच पालघर, ठाणे या जिल्ह्यामध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.


आजपासून (सोमवार, 23 सप्टेंबर) पुढील काही दिवस ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. राज्याभरात या आठवड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह दमदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या कालावधीत काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.


एवढा पाऊस का?


महाराष्ट्राच्या वर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याच्या प्रभावामुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्र व लगतच्या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हा कमी दाबाचा पट्टा का तयार झाला?


सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यामागे मूळ कारण पश्चिम बंगाल्चाय खाडीमधील वातावरणाची स्थिती असल्याचं सांगितलं जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण म्यानमार आणि बंगालच्या खाडीत वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता मोठी असून पश्चिम बंगालजवळ बंगालच्या खाडीवर निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने होण्याचा अंदाज आहे. त्यामुळेच आजपासून म्हणजेच सोमवारपासून (23 सप्टेंबर) शनिवारपर्यंत (28 सप्टेंबर) राज्यात सर्वदूर दमदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.