पुणे : राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम असतानाच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच दिग्गज नेते उपस्थित होते, पण प्रफुल्ल पटेल यांची या बैठकीतली गैरहजेरी चर्चेचा विषय ठरत आहे. पटेल यांना निमंत्रण नव्हतं की अन्य काही कारणामुळे ते गैरहजर राहिले, हे अद्याप समजू शकलेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेसोबत जाण्यावरून प्रफुल्ल पटेल यांची भूमिका कायमच संदिग्ध राहिली आहे. त्यामुळे त्यांना या बैठकीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीच्या या बैठकीला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड हे दिग्गज नेते उपस्थित होते.


राष्ट्रवादीची बैठक झाल्यानंतर आता शरद पवार हे उद्या दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये शिवसेनेसोबत पर्यायी सरकार स्थापन करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. यानंतर मंगळवारी पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते बैठक घेऊन पुढची भूमिका ठरवणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेससोबत लढलो, त्यामुळे पुढचा निर्णय काँग्रेससोबत चर्चा करुन घेऊ, असं वक्तव्य मलिक यांनी केलं आहे.


ज्या भाजपाविरोधात लढलो त्या पक्षासोबत जाण्याला मर्यादा आहेत, असं सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीला आले असताना पाटील यांनी भाजपासोबत जाण्याची शक्यता पूर्णतः फेटाळली नाही. शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात 'दगडापेक्षा वीट मऊ' अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज्यात सरकार देण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. शरद पवारच याबाबत निर्णय घेतील, असंही पाटील म्हणालेत.