भाडे करार 11 महिन्यांचा का असतो? या मागचे कारण जाणून घ्या
What is Rent Agreement: भाडे करार ( Rent Agreement) कालावधी हा 11 महिन्यांचा का असतो? असा तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल. तुम्ही कधी घर भाड्याने घेतले आहे का? मग तुमच्या घरमालकाने तुम्हाला 11 महिन्यांसाठी भाडे करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले असेल तर..
मुंबई : What is Rent Agreement: भाडे करार ( Rent Agreement) कालावधी हा 11 महिन्यांचा का असतो? असा तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल. तुम्ही कधी घर भाड्याने घेतले आहे का? मग तुमच्या घरमालकाने तुम्हाला 11 महिन्यांसाठी भाडे करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले असेल. घर भाड्याने घेणे आणि 11 महिन्यांचा करार करणे, ही एक सामान्य गोष्ट आहे. या कराराचे अनेक वेळा नूतनीकरण केले जाऊ शकते, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की भाडे करार केवळ 11 महिन्यांसाठी का असतो आणि 12 किंवा त्याहून अधिक महिन्यांसाठी का नाही?
भाडे करार हा तो दस्तऐवज आहे, ज्यामध्ये दोन्ही पक्षांसाठी अटी आणि शर्ती लिहिल्या जातात. हे भाडेकरु आणि घरमालक यांच्यातील कायदेशीर संबंध म्हणून काम करते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, किचकट प्रक्रिया आणि भाडेकरूंना अनुकूल असलेले कायदे यामुळे अनेकदा घरमालकाला मालमत्ता रिकामी करणे कठीण होते. या प्रक्रियेला होत असलेल्या दिरंगाईमुळे घरमालकाला न्याय मिळण्यासही बराच कालावधी लागतो. या दरम्यान देखील भाडेकरु मालमत्तेचा वापर करत असतो.
जर भाडेकरार एक वर्षापेक्षा कमी असेल तर त्याची नोंदणी करण्याची गरज नाही. नोंदणी अधिनियम 1908 च्या कलम 17 अन्वये, एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी भाडेपट्टी कराराची नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच, एक वर्षापेक्षा कमी कालावधीचे भाडेकरार नोंदणीशिवाय केले जाऊ शकतात.
जर भाडेकरार एक वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्याची नोंदणी करावी लागणार नाही किंवा तुम्हाला मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. अशा प्रकारे प्रक्रियेत पैशांचीही बचत होते.
जर एखाद्याने भाडे कराराची नोंदणी करणे निवडले, तर मुद्रांक शुल्काची रक्कम भाडे आणि मुक्कामाच्या कालावधीद्वारे निर्धारित केली जाते. भाडेकरु जितका जास्त काळ राहतील तितके जास्त मुद्रांक शुल्क भरावे लागेल. त्यामुळे, भाडे करार नोंदणीकृत असला तरीही, कमी कालावधीमुळे तुम्हाला मुद्रांक शुल्कात मोठी रक्कम भरण्यापासून वाचवले जाईल.
त्यामुळे ते भाडेकरु आणि घरमालक दोघांसाठीही फायदेशीर आहे आणि ते दोघेही अनेकदा सहमत असतात. बरेच लोक भाडे करार नोंदणीकृत करण्याऐवजी नोटरी करुन घेतात.