Satara Loksabha Election 2024 : सातारा... एकेकाळची मराठ्यांची राजधानी... राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला.. तेव्हा सातारा लोकसभा मतदारसंघावर (Satara Loksabha Contituency) महायुतीत दावा सांगितलाय तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीने.. मात्र भाजपचे उदयनराजे भोसले पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहेत. महायुतीचा तिढा सुटत नसल्याने उदयनराजेंना (Udayanraje) मात्र वेटिंगवर राहावं लागतंय. दिल्लीत थेट अमित शाहांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंचं तिकीट फायनल झाल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, दिल्लीवारीनंतरही उदनयराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयनराजेंनी स्वत:च उमेदवारी जाहीर करुन टाकलीय. उमेदवारीवरुन आता माघार नाही असं उदयनराजेंनीच ठणकावलंय. जर भाजपकडून सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत दगा झाला तर उदयनराजेंचं आक्रमक रुप पाहायला मिळू शकतं. शरद पवारांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवली. त्याला उदयनराजेंनही त्याच तोडीचं प्रत्युत्तर दिलं, हे विसरुन चालणार नाही. सातारा लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नसल्याने इच्छुकांचीही भाऊगर्दी दिसून येतेय. उमेदवारी मिळण्याच्या आशेने त्यांचीही धाकधूक वाढलीय.


अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून वाईचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांना देखील उमेदवारीची आशा आहे. उदयनराजे भोसलेंनी मात्र आपल्या प्रचाराला सुरुवात केलीय. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आहेत. तेव्हा या घराण्यावर प्रेम करणा-यांची संख्या राज्यात आणि साता-यातही जास्त आहेत. उदयनराजे भोसलेंचं फॅन फॉलोइंगसुद्धा प्रचंड आहेत. 


उदयनराजे भोसलेंना उमेदवारी देण्यावरुन दगा झाल्यास राज्यात महायुतीलाही त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे भाजपला उदयनराजेंना तिकीट देण्यावाचून पर्यायच उरलेला नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अजित पवार सातारा लोकसभेच्या जागेसाठी अडून बसले आहेत. तेव्हा साता-यातून कोणाला तिकीट मिळतंय याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. 


दरम्यान, 2009 मध्ये उदयनराजे भोसलेंनी (Udayanraje Bhosle) शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधवांचा तब्बल 3 लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष पुरुषोत्तम जाधवांना साडे तीन लाख मतांनी पराभवाचं पाणी पाजलं. 2019 मध्ये शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा धुव्वा उडवून उदयनराजेंनी विजयाची हॅटट्रिक केली. मात्र अवघ्या 3 महिन्यात राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला. त्यामुळं विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शरद पवारांच्या भर पावसातल्या सभेनं अख्ख्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण बदलून टाकलं. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी भाजपच्या उदयराजेंना तब्बल 87 हजार मतांनी धूळ चारली.