योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : निफाड तालुक्यातील गणेश नगर इथल्या सचिन उर्फ काळू दुसाने या तरुणाच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं असून सचिनच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन हा त्याच्या पत्नीच्या आणि बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय महाजन यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी सचिनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एका रिक्षाचालक आणि इडली डोसा विकणाऱ्याला एक लाख रुपयांची सुपारी दिली. 


काही दिवसांपूर्वी सचिन दुसाने यांचा मृतदेह पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळला होता. ही हत्या कोणी केली, का केली याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नव्हता. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि त्यांच्या हातात महत्त्वाचे धागेदोरे लागले. सचिन दुसाने यांची पत्नी आणि बांधकाम व्यावसायिक दतात्रय महाजन यांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याआधारे पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली.


पोलिसांनी दतात्रय महाजनला ताब्यात घेत चौकशी सुरु केली. चौकशीत धक्कादायक सत्य उघडकीस आलं. सचिनची पत्नी आणि दतात्रयने सचिनच्या घरातच त्याची हत्या केली.  यासाठी त्यांनी संदीप रखामी, गोरख जगताप, अशोक काळे आणि पिंटू मोगरे यांची मदत घेतली. हत्येनंतर त्यांनी हत्यारांची आणि मोबाईलची विल्हेवाट लावली तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली डस्टर कार भंगार व्यावसायिकाल स्क्रॅपमध्ये विकली.


या हत्येप्रकरणआर पोलिसांनी ६ मोबाईल फोन आणि एक लाखांची रक्कम असा मुद्येमाल जप्त केला आहे.