लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल का? विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला काय वाटतं?
Maharashtra Vidhansabha AI Survey : विधानसभा निवडणुकीच्याआधी महाराष्ट्रात सुरु केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल का? यावर महाराष्ट्रातील जनतेला काय वाटतं?. जाणून घ्या AI सर्व्हेतून
Maharashtra Vidhansabha AI Survey : लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट लढत बघायला मिळणार आहे. अशातच आता महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री लाडकी योजना ही गेम चेंजर ठरणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. यावर महाराष्ट्रातील जनतेने काय मत व्यक्त केलं आहे. पाहा AI सर्व्हेतून.
सर्वात मोठा सर्व्हे
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आली असताना झी 24 तासने लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठा AI सर्व्हे केला आहे. पहिली मराठी AI अँकर झीनिया हा सर्व्हे जाहीर करणार आहे. हा सर्व्हे आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर करून करण्यात आला आहे. यामध्ये डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करुन हा सर्व्हे तयार केला गेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सर्व्हे करण्यात आला असून यामध्ये लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल का? यांचा अंदाज घेण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल का?
विधानसभा निवडणुकीच्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. मात्र, लाडकी बहीण योजने संदर्भात विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर झी 24 तासने मतदारांचा कौल जाणून घेतला आहे. यामध्ये 55 टक्के लोकांना वाटते की लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल. तर 30 टक्के लोकांना वाटते की लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार नाही. तसेच 15 टक्के लोकांनी यावर आपले मत व्यक्त केले नाही.
काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना?
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर 28 जून रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये अर्थसहाय्य राज्य सरकार तर्फे देण्यात येणार आहे. 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच अविवाहित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. बुधवारी 35 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्यानंतर आता 1.25 कोटी महिलांच्या खात्यात महिन्याअखेर पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
(डिस्क्लेमर- वरील माहिती ही 'झी 24 तास'ने महाराष्ट्राच्या 288 मतदार संघात जाऊन केलेलं सर्व्हेक्षण आहे. हा कोणत्याही प्रकारचा निकाल नसून जनमताचा कौल आहे.)