मुंबई : कर्जमाफी आणि हमीभावाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी संप पुकारल्यामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या मुद्द्यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी राजकारण करत असेल तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार नाही. जे खरे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांशी अजूनही चर्चा करायला आम्ही तयार आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण लागलं. उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील ५ एसटी बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या.


यात कळंब तालुक्यात मोहा आणि मस्सा येथे ३ तर लोह-यामध्ये २ बसेसची तोडफोड करण्यात आली. उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी परीसरातील संतप्त शेतकऱ्यांनी समुद्रवाणी तांडा रस्त्यावर जाळपोळ करून आणि अर्धनग्न आंदोलन करत रस्ता रोको केला. त्यामुळे उस्मानाबाद-औसा रस्त्यावरील वाहतूक बंद झाली.


नागपूर - शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आंदोलन दुधाचा टँकर अडवून दूध रस्त्यावर फेकले.जय जवान-जय किसान संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. नागपूरच्या दिघोरी चौकात आंदोलन हे आंदोलन करण्यात आले.


मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुकमधील शेतकरी कर्जमाफीसाठी  गावातील सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर चढलेत आणि शोले स्टाइल आंदोलन केले.