नाशिकमध्ये महिला गुन्हेगारांची कृष्णकृत्य उजेडात
नाशिकमध्ये महिला गुन्हेगारांची कृष्णकृत्य उजेडात येत आहेत. खून, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यामध्ये महिला मास्टरमाइंड असल्याच समोर आलं आहे.
मुकूल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : ऐन नवरात्रात एकीकडे नारीशक्तीचा उदो उदो होत असताना नाशिकमध्ये मात्र वेगळंच उघडतंय. नाशिकमध्ये महिला गुन्हेगारांची कृष्णकृत्य उजेडात येत आहेत. खून, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यामध्ये महिला मास्टरमाइंड असल्याच समोर आलं आहे.
कॅमेऱ्यासमोर तोंड लपवणारी ही आहे राणी साळवे आणि तिचा प्रियकर अनिल ताठे. विवाहबाह्य संबंधातून राणीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला. एवढंच नाही तर त्याच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचला. राणीचा पती शरद साळवे याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. पण पोलिसांनी सखोल तपास केला असता राणीचा कट उघड झाला.
नाशिक शहरातली केवळ ही एक घटना नाही. ऐन नवरात्रोत्सवात एका महिला डॉक्टरला धमकी देऊन अडीच लाखांची खंडणी उकळणाऱ्या महिला वकिलाला पोलिसांनी अटक केलीय. आता तिची जामीनावर मुक्तता झालीय.
याच कालावधीत क्राईम ब्रँचची अधिकारी असल्याची बतावणी करून ७५ हजार रूपयांची खंडणी मागणाऱ्या प्रतिभा भुजबळ या महिलेलाही तिच्या साथीदारासह अटक कऱण्यात आली आहे. यासोबतच सोनसाखळी चोरीतही महिलांचा सहभाग असल्याचं उघड होतं आहे.
नाशिकची गुन्हेगारी गेल्या काही दिवसात चांगलीच गाजली आहे. पण या गुन्हेगारीतला हा वेगळाच अँगल आता समोर यायला लागलाय. त्यामुळे नाशिकमधले विचारवंत आणि पोलीसही गोंधळात पडले आहेत.