मुकुल कुलकर्णी, झी मिडिया, नाशिक : २०१८चं स्वागत करता-करता नशिकमध्ये दोन विवाहित महिलांचा खून झाला. तर एकीला आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवावी लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंब व्यवस्थेला लागणारी घरघर आणि उडणारा विश्वास याला कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढला जातोय.


नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहितगाव परिसरात राहणाऱ्या साक्षी हांडोरे या महिलेची तीन जानेवारीला पतीनेच हत्या केल्याचं निदर्शनास आलं. विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव सुरिवातीला रचण्यात आला होता. मात्र, पोलीस तपासात पती उल्हास हांडोरेनेच गळा चिरून हत्या केल्याच उघडकीस आलं. 


या घटनेची चर्चा थांबत नाही तोच चार दिवसांनी जेलरोड परिसरातील शिवरामनगरमध्ये राहणाऱ्या अण्णासाहेब गायकेंचं पत्नीसोबत भांडण झालं. मद्यधुंद अवस्थेत त्यानं पत्नीच्या डोक्यात लोखंडी सळई घालून खून केला. प्रतिकार करणाऱ्या दोघा मुलांवरही त्यानं हल्ला केला. 


या दोन घटनांचा तपास पूर्ण होत नाही तोच सप्तशृंगी गडावरील शितकडावरून कांचन निफाडे या विवाहीतेनं आपल्या चार वर्षाच्या मुलीसह उडी मारून आत्महत्या केली. सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झालाय. 


या तिन्ही घटना प्रतिनिधिक आहेत. मात्र, आजच्या स्थितीत बहुतांश घरात वाद अस्वस्थता बघायला मिळते. नाशिक जिल्ह्यातील एकमेव अशा कौटुंबिक न्यायालयात तीन वर्षात घटस्फोटांसाठी तब्बल ५ हजार १७३ दावे दाखल झाल्याची नोंद आहे. कुटुंब संस्था खिळखिळी झाली असल्याचं या आकडेवारीतून सिद्ध होतंय. 


घटस्फोटासाठी मोठ्या प्रमाणात दावे दाखल होतात. त्यामुळे लग्नव्यवस्था टिकावी आणि नात्यातील  विश्वास कायम राहावा या उद्देशानं न्यायालयाकडून तक्रारदार आणि नातेवाईकांसाठी समुपदेशनाचं काम केलं जातं. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो हीच काय ती आशादायक बाब आहे.



कौटुंबिक वादातून महिला मृत्यू प्रमाणात वाढ