Mumbai News: कांदिवली पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. या महिलेने डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर रुग्णालयातून 20 दिवसांच्या बाळाचे अपहरण केले होते. महिलेने बाळाचे अपहरण तर केले मात्र, नंतर असं काही घडलं की महिलेने थेट पोलिस ठाणे गाठले व बाळ पोलिसांकडे स्वाधीन केले. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत महिलेला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचं लग्न झालं होतं. मात्र, कित्येक वर्ष तिला मुल बाळ नव्हतं. तिच्या आजूबाजूचे लोक तिला यावरुन सतत टोमणे मारत होते. या टोमण्यांनी वैतागलेल्या महिलेने एका नवजात बाळाचे अपहरण करण्याचा कट रचला. गुरुवारी दुपारी कांदिवलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ती गेली. तिथे 26 वर्षांची रिंकी जयस्वाल ही तिच्या 20 दिवसांच्या बाळाच्या तपासणीसाठी आली होती. 


रिंकी तिचां नंबर येण्याची वाट पाहत होती. त्याचवेळी आरोपी महिला तिच्याजवळ येऊन बसली. जवळपास दीड ते दोन तास ती रिंकीसोबत गप्पा मारत बसली होती. गप्पा मारता मारता दोघींमध्ये मैत्री झाली. त्यानंतर महिलेने रिंकीला सांगितले की किती वेळापासून तु बाळाला घेऊन बसली आहेस. त्याला थोडावेळ माझ्याकडे दे तु फ्रेश होऊन ये. रिंकीने महिलेच्या बोलण्यात येऊन तिच्याकडे बाळाला दिले. मात्र, वॉशरुममधून बाहेर येताच बाळ आणि महिला दोघंही गायब होते. 


आपल्या बाळाचं अपहरण करण्यात आलंय. हे रिंकीच्या लक्षात येताच तिने लगेचच कांदिवली पोलिस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक हेमंत गीते आणि पथकाने तात्काळ यासंबंधात सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी सीसीटिव्हीतून त्या रिक्षा चालकाचा नंबर मिळाला ज्यात आरोपी महिला बसली होती. कांदिवली पोलिसांनी तपास करत महिलेचा शोध घेतला तेव्हा त्यांना कळले की महिला आधीच वनराई पोलिस ठाण्यात बसली होती. 


महिला बाळाला घेऊन वनराई पोलिस ठाण्यात बसलेले पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. तेव्हा वनराई पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला स्वतःहून बाळाला घेऊन आली होती. हे बाळ रस्त्यात सापडलेले आढळले म्हणून मी त्याला इथे घेऊन आले, असं खोट तिने पोलिसांना सांगितले. मात्र तोपर्यंत कांदिवली पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. 


पोलिसांनी महिलेची चौकशी केल्यानंतर तिने सांगितले की, तिला मुल नाहीये म्हणून सतत तिला टोमणे ऐकावे लागतात. या टोमण्यांना वैतागून तिने बाळाचे अपहरण केले. मात्र, रस्त्यातच तिला जाणवले की ती गरोदर नसतानाही बाळ कुठून आले, याची उत्तरे घरात व बाहेरच्या लोकांना द्यावी लागतील. असं झालं तर आपलं बिंग फुटेल. त्यामुळं तिने पोलिसांत धाव घेत खोटा दावा केला.