मुंबई : यंदा राज्याचा महिला दिन Women`s Day 2020 कोल्हापुरात साजरा केला जाणार आहे. या महिला दिनावरही कोरोनाचं सावट असणार आहे. परिणामी महिलांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना मेळाव्याला आणलं जाणार आहे. ज्यामध्ये महिलांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात फोफावणारा कोरोना व्हायरस आणि त्याचं भारतावरही असणारं सावट पाहता महिला दिनाच्या दिवशीही याविषची सतर्कता पाळली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याबाबत सूचना केल्या असल्याचं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये येणाऱ्यांना देण्यात येणारं अल्पोपहार आणि जेवण याचीही तपासणी करून दिली जाणार आहे. 


राज्याच्या या महिला दिन समारंभासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसह कोकणातून जवळपास ४० हजार महिला उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महिला दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात महिलांच्या वैद्यकीय तपासणीचा मानस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर केरळमध्ये या खास दिवसाचं औचित्य साधत काही महत्त्वाच्या विभागांची सूत्र महिला अधिकाऱ्यांच्या हाती सोपवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये राज्यातील पोलीस ठाण्यांसोबत रेल्वे वाहतुक यंत्रणेचाही समावेश आहे. 



woman's day 2020 : 'या' राज्याची सर्व सूत्र महिला अधिकाऱ्यांच्या हाती


दरम्यान, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये आयोजित होणाऱ्या अनेक कार्यक्रमांवर टांगती तलवार आली आहे. राज्य शासनाकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात मोठ्याप्रमाणावर नागरिक एकत्र जमणार नाहीत, याबाबत काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी लोकांना मेळावे आणि यात्रांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याच धर्तीवर महिला दिनाच्या उत्साहाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.