Women`s Day 2023 : महिलाराज! महिलांद्वारे चालवली जाणारी राज्यातील पहिली खासगी बाजार समिती
आज जगभरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय, विविध क्षेत्रात महिलांनी केलेल्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा दिवस. नाशिक जिल्ह्यात पुरुषांचं क्षेत्र समजल्या जाणाऱ्या बाजार समितीत महिल पाय रोवून उभ्या आहेत.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : आतापर्यंत आपण महिलांचे बचत गट, सहकारी संस्था गृह उद्योग ऐकले असतील. पण नाशिक जिल्ह्यातील (Nashik) कळवण तालुक्यात महिलांनी थेट कांदा खरेदी विक्रीसाठी खाजगी बाजार समिती (Market Committee) स्थापन केली आहे. विशेष म्हणजे एकाच वर्षांमध्ये त्यांनी 60 कोटी रुपयांचा व्यवहार केलाय. नाशिक जिल्ह्यात अभोणा इथं शिवसिद्ध गोविंद खाजगी कृषी उत्त्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) आहे. अभोण्यातील ही पहिली खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती असून ही बाजार समिती महिलांनी स्थापन केली आहे.
एकूण अकरा एकरवर तयार करण्यात आलेल्या या बाजार समितीत कर्मचारी व्यवस्थापक सुद्धा महिला आहेत. शेतकऱ्यांसाठी लिलाव मोजणी वजन मापे यंत्र तसंच इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बाजार समितीत 15 व्यापारी असून शेतकऱ्यांची (Farmers) संख्या दिवसाला 400 ते 500 इतकी असते. बाजार समितीत दिवसाला 2 हजार ते साडेचार हजार क्विंटल माल विक्रीसाठी येत असतो. याशिवाय बाजार समितीचे सर्व व्यवहार रोख पद्धतीने होत असल्याने शेतकऱ्याने माल विकल्यानंतर त्याला लगेचच मालाचे पैसे दिले जातात
अभोणा हा ग्रामीण भाग असल्याने या भागात प्रामुख्याने आदिवासी लोक राहतात. या भागातील आमदार खासदार सुद्धा आदिवासीच आहेत. या आदिवासी बांधवांना त्यांचा शेतमाल गुजरातमध्ये न नेता याच बाजार समितीत आता विकता येतो. तसंच वाढत्या उलाढालीमुळे आदिवासींना छोटेमोठे रोजगार उपलब्ध झाले आहे. शेतीविषयक शॉपिंग मॉल, कोल्ड स्टोरेजची सुविधा देण्यात आल्याने थेट निर्यात करणे शक्य झालं आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख कांदा बाजारपेठा पिंपळगाव लासलगाव या बाजार समिती परिसरापासून 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असल्यानं ही बाजारस्समिती मायेच्या सावलीप्रमाणे वाटतेय. त्यामुळे महिलांची महिलांनी चालवलेली बाजार समिती जिल्ह्यात वेगळी ठरली आहे.