Maharashtra Fort : राज्यातील तमाम शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या गड किल्ले ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्यांचे अस्तित्व टिकून राहावे, पुढच्या अनेक पिढ्यांना यातून प्रेरणा मिळावी यासाठी शिवप्रेमी प्रयत्न करत असतात. त्यात आता गडकिल्ले प्रेमींच्या चेहऱ्यावर आनंद देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या 2024-25 जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील प्रस्ताव पाठविला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल माहिती दिली. किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.


कोणत्या गड-किल्ल्यांचा समावेश? 


1) साल्हेर
2)शिवनेरी
3)लोहगड
4) खांदेरी
5)रायगड
6)राजगड
7)प्रतापगड
8)सुवर्णदुर्ग
9)पन्हाळा
10) विजयदुर्ग
11)सिंधुदुर्ग


महाराष्ट्रातील या 11 किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादी मध्ये नामांकनासाठी पाठविण्यात आला आहे. यामध्ये  तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याचाही समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


नामांकनासाठी पाठविलेल्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्रातील शिववारशांचा समावेश असून या किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळू शकेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.