श्रीकांत राऊत, झी मीडिया यवतमाळ : यवतमाळच्या (Yavatmal) एसटी महामंडळाची (MSRTC) बस अज्ञातांनी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या सुमारास आलेल्या अज्ञातांनी बसला पेटवून दिलं. महत्त्वाची बाब म्हणजे या बसमध्ये 76 प्रवासी होते. मात्र वेळीच प्रवासी बाहेर पडल्याने सर्वांचा जीव वाचला आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमरखेड तालुक्यात नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी एसटी महामंडळाची बस पेटवून दिली. गोजेगाव नजीकच्या पैनगंगा पुलावर ही घटना घडली. या बसमध्ये 76 प्रवासी होते, जे सुखरूप आहे. आधी या बसला एका मोटारसायकल स्वाराने थांबवले होतं. त्यानंतर लगेचच त्यामागून पाच ते सहा युवक आले. तो पर्यंत बसचालकासह सर्व प्रवासी खाली उतरले होते. त्याच दरम्यान बस अडवणाऱ्या अज्ञात लोकांनी अचानक पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. हा सगळा प्रकार पाहून पाहून प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. ही बस नेमकी का आणि कशासाठी पेटवली याचा तपास पोलीस करीत आहे.


दरम्यान, अज्ञातांनी एमएच 20 - जीसी 3189 या क्रमांकाच्या बसला पेटवून दिलं आहे. या घटनेत एसटी बसचे तब्बल 32 लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. बसला पेटवून देणारे कोण होते आणि त्यांनी असा प्रकार का केला याचा शोध उमरखेड पोलीस घेत आहे. या बसवर चालक बी.डी. नाईकवाडे, तर वाहक एस.एन. वाघमारे हे होते. घटनास्थळी यवतमाळ आणि नांदेड एसटी विभाग नियंत्रकांनी व इतर अधिकाऱ्यांनी भेट दिली.