यवतमाळ: आपल्या घरात लहान मुलं असतील तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण तुमच्या घरातील मुलं अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांना हात लावत असतात. त्यांच्याशी खेळत असतात किंवा बऱ्याचदा इलेक्ट्रीक सॉकेटमध्ये बोट घालण्याचे चाळे करत असतात. त्यामुळे पालकांनी डोळ्यात तेल घालून त्यांना पाहाणं गरजेचं असतं. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना लहान मुलाच्या बाबतीत घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलरचा शॉक लागून मुलाचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या झरी तालुक्यातील गणेशपूरमध्ये घडली. दिव्यांशू सुरेश बांदूरकर असं 11 वर्षीय मृत मुलाचं नाव आहे. दिव्यांशुचे आई - वडील बाहेर होते. त्याची मोठी बहीण घरी परतली तेव्हा कुलर जवळ दिव्यांशू शांत पडलेला दिसला. कुलर सुरू करत असताना त्याला विजेचा धक्का लागल्याचं समोर आलं आहे. 


दिव्यांशू घरी जेवायला आल्यानंतर त्याने कुलर सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्याला विजेचा जोरात झटका लागला असावा असं निदर्शनास आलं आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 


लहान मुलं अनेकदा उपकरणं सुरू करताना किंवा त्याच्या जवळ जात असतात. घरात त्यांना एकटं सोडून जाणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे दिव्यांशूच्या बाबतीत जे घडलं ते खूपच दु:खत आहे. अशी वेळ कोणत्याही मुलावर येऊ नये यासाठी प्रत्येक पालकानं लहान मुलांच्या बाबतीत सतर्क रहायला हवं.