शेतकऱ्यांना विषबाधा : ...तर अधिकारी आणि मंत्रालयात किटकनाशक फवारणी - बच्च कडू
पिकांवर औषधांची फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना १५ दिवसांत तात्काळ मदत केली नाही तर अधिकारी आणि मंत्र्यांच्या कार्यालयात किटकनाशकांची फवारणी करु, असा गंभीर इशारा कडू यांनी दिलाय.
यवतमाळ : पिकांवर औषधांची फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना १५ दिवसांत तात्काळ मदत केली नाही तर अधिकारी आणि मंत्र्यांच्या कार्यालयात किटकनाशकांची फवारणी करु, असा गंभीर इशारा कडू यांनी दिलाय.
विषबाधा झाल्याने यवतमाळमधील १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर बाधा झालेल्या ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांवर उपचार सुरु आहेत. पिकांना वाचविण्यासाठी बळीराजाचा जीव गेला असल्याने त्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केलेय.
मुंबईत रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी होवून मृत्यूंच्या कुटुंबीयाना मदतीसाठी जी तत्परता सरकारने दाखविली तेवढ्याच तातडीने ही मदत शेतकऱ्यांसाठी देखील आवश्यक होती. मात्र सरकार यवतमाळचे पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी झोपलेले आहेत का, असा संतप्त सवाल आमदार कडू यांनी केला.
बोगस औषधे आणि औषध फवारणीबाबत गंभीर नसलेल्या कृषी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी मरत आहेत. त्यामुळे १५ दिवसात त्यांना मदत न दिल्यास कृषी सचिव आणि कृषी मंत्र्यांच्या कार्यालयात किटकनाशकांची फवारणी करु, असा इशारा देखील आमदार बच्चू कडू यांनी दिला.