यवतमाळमध्ये नरभक्षक वाघिणीचा १४ वा बळी
14 व्या बळीमुळे पुन्हा ग्रामस्थ संतप्त
यवतमाळ : यवतमाळच्या कळंबमध्ये नरभक्षक वाघिणीनं १४ वा बळी घेतलाय. पिंपळशेंडा परिसरात वाघिणीनं ही शिकार केलीय. नागोराव उर्फ श्रीराम जुनघरे असं वाघानं फडशा पाडलेल्या गुराख्याचं नाव आहे. ही नरभक्षक वाघीण रात्री मृतदेहाजवळच बसून होती. त्यामुळं ग्रामस्थांना बराच वेळ मृतदेह ताब्यात घेणंही शक्य होत नव्हतं. बऱ्याच वेळानंतर ग्रामस्थ मृतदेहाजवळ पोहोचले.
मंगळवारी गुरं चारायला निघालेले नागोराव सायंकाळपर्यंत घरी परतले नाहीत. त्यामुळं त्यांचा शोध घेताना त्यांचा मृतदेह सापडला. 3 दिवसांपूर्वीच ही नरभक्षक वाघीण वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात टिपली गेली होती. तत्पूर्वी 2 वर्षात या वाघिणीने 13 शेतकरी शेतमजूर गुराख्यांच्या नरडीचा घोट घेतला. राळेगाव, कळंब, पांढरकवडा तालुक्यात या वाघिणीची प्रचंड दहशत आहे.
ग्रामस्थ शेती कामासाठी घराबाहेर पडत नाहीत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने वाघाचा बंदोबस्त करावा म्हणून ग्रामस्थ आक्रमक होऊन हिंसक आंदोलनं देखील झाली. मात्र प्रत्येक वेळी वाघिणीचा बंदोबस्त करू असे आश्वासन देऊन वनमंत्री, स्थानिक आमदार आणि वनाधिकाऱ्यांनी परिस्थिती हाताळली. आता वाघाच्या हल्ल्यात गेलेल्या 14 व्या बळीमुळे पुन्हा ग्रामस्थ संतप्त आहेत.