पोट दुखतंय म्हणून पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर दिले चटके; यवतमाळमधील अघोरी प्रकार
Yavatmal News : पोटदुखीमुळे नवजात बाळ सतत रडत असल्याने पालकांनी त्याला दवाखान्यात घेऊन न जाता आई-वडिलांनी त्याच्या पोटावर बिब्याचे चटके देऊन उपाय केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्बा गरम करुन चटके देण्यात आले आहेत.
श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही लोक अंधश्रद्धेला (Superstition) बळी पडताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार यवतमाळमध्ये (yavatmal news) पाहायला मिळाला आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर पोटदुखीच्या त्रासाने ते रडतेय म्हणून काळजीपोटी जन्मदात्या आई वडिलांनी गावातील जुन्या मंडळींचे ऐकून अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार केला आहे. आई वडिलांच्या या उपायामुळे 11 दिवसांच्या चिमुकलीची मृत्यूसोबत झुंज सुरु आहे.
यवतामाळमध्ये हा सर्व हृदयद्रावक प्रकार घडला आहे. पोटदुखीमुळे नवजात बाळ सतत रडत असल्याने पालकांनी मुलीच्या पोटावर चटके दिल्याची धक्क्दायक माहिती समोर आली आहे. नवजात बाळ रडत असताना त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यापेक्षा आई-वडिलांनी गावातल्या लोकांचे ऐकून त्याच्या पोटावर बिब्याचे चटके दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्बा गरम करुन चटके देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. या सर्व प्रकारामुळे बाळाची प्रकृती आणखीनच खालावली आहे.
घाटंजी तालुक्यातील पारवा पीएचसी मध्ये प्रसूती झाल्यानंतर आईवडील मुलीला घरी घेऊन गेले होते. मात्र ती रडतेय म्हणून त्यांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता जेष्ठ मंडळींनी सांगितलेल्या अघोरी प्रकाराचा प्रयोग केला. पालकांनी पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करून त्याचे चटके दिले. मात्र या अमानवीय प्रयोगामुळे बाळाची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली. त्यामुळे त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात पोहोचताच चिमुकलीवर अपचार करण्यास डॉक्टरांनी सुरुवात केली.
मात्र चिमुकलीची प्रकृती खूपच चिंताजनक असल्याने तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टर या चिमुकलीला जीवदान देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मन हेलावणाऱ्या या अघोरी प्रकारामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचे पुरते धिंडवडे निघाले आहे. माता बाल मृत्यू रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कंत्राटी सेवक, आशा गावागावात कार्यरत असूनही गरोदर माता व नवजात बालकांसाठी वरिष्ठ गंभीर नाहीत. परिणामी अज्ञान, अंधश्रद्धा यातून अनेक जीवांशी खेळ होत आहे.
अमरावीतमध्ये बाळाच्या पोटावर 100 चटके
दरम्यान, अमरावतीमध्येही तीन वर्षांपूर्वी अशाच प्रकाराची घटना घडली होती. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यामधल्या बोरदा या अतिदुर्गम आदिवासी गावात धक्कादायक प्रकार समोर आला होता. आजारी असलेल्या आठ महिन्यांच्या बाळाच्या पोटावर आई-वडिलांनीच गरम विळ्याने चटके दिले होते. एका मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आई-वडिलांनी बाळाच्या पोटावर गरम विळ्याने शंभर चटके दिले होते.