श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळच्या उमरखेड पोलीस विभागाच्या इमारत बांधकामासाठी अवैध चोरीची रेती वापरल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महसूल पथकाने या कामावर येत असलेला अवैध रेतीचा ट्रेलर जप्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमरखेड पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पोलीस वसाहत नव्याने उभारण्यात येत असून या कामासाठी बी. एल. मेहता या कंपनीकडून परप्रांतातील चोरीच्या रेतीचा वापर केला जात होता.
 
या कंपनीने परिसरात मोठ्या प्रमाणात शासकीय कामं केली. या कामांवर चोरीची रेती वापरल्यास कारवाई होणार नाही असा कंत्राटदाराचा समज होता. मात्र महसूल पथकाला याबाबची माहिती मिळताच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पथकाने चोरीच्या रेतीचा ट्रेलर पकडला. 



चालकाने वाहन तहसील प्रांगणात लावण्यास नकार दिल्याने कंपनीकडून ऑनलाइन ई-चलान नुसार ३३ क्युबिक मीटर रेतीचे चलान फाडून पथकाच्या हातात देण्यात आले.


हा ट्रक मध्यप्रदेशातील बापसा नंबर २, मंडला या ठिकाणावरून निघून उमरखेड येथील कामावर पोहोचण्यासाठी निघाला असे या चलान वर दर्शविण्यात आलेले आहे.


या चलानाची तफावत पाहून महसूल विभागाने कारवाई केली.