सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कडाडून विरोध केला आहे. याविरोधात पडळकर यांनी सांगलीत रान पेटवले आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमदार सदाभाऊ खोत हे ही रस्त्यावर उतरले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांविरुद्ध रान पेटवलं आहे. भाजप कार्यकर्ते यांनी हाती पिवळे झेंडे घेत आक्रमक भूमिका घेतलीय. ज्या शरद पवारांनी गोरगरिबांची फसवणूक केली. त्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे अनावरण होऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतलीय. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सदाभाऊ खोत यांनीही टीका केलीय. शरद पवार यांचा सांगली जिल्ह्याशी काही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या हस्ते उद्घाटन नको. तुम्हीच आतापर्यंत किती उद्घाटन केली? कंटाळा नाही आला का? असा खोचक सवाल सदाभाऊ खोत यांनी केलाय. 


तर, आमदार पडळकर 'कितीही पोलीस बळाचा वापर केला तरी आम्ही आजच उद्घाटन करणार अशी ठाम भूमिका घेतलीय. आम्ही आमच्या परंपारिक पद्धतीने इथे आलोय. आम्ही पोलिसांना घाबरणार नाही. हे उद्घाटन महाराष्ट्र बघेल असे थेट आव्हान दिलेय. 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. तो आमच्या मेंढपाळाच्याच हस्ते पार पडेल. मात्र, सरकार मेंढपाळांना विरोध करून पदाने मोठी असलेली माणसं मनानं छोटी असल्याचे दर्शन घडवत असल्याचा आरोप त्यांनी केला. 


पालकमंत्री जयंत पाटील यांचे कारस्थानं असून कारस्थानं करण्यातच त्यांचं आयुष्य गेलंय, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 


दरम्यान, पोलिसांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळील संपूर्ण परिसर सील केला आहे. पोलिसांच्या तसेच एसआरपीएफच्या तुकड्या येथे दाखल झाल्या असून पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केलीय.