इलेक्ट्रिक बाईक उठली जीवावर! साताऱ्यात तरुणीचा मृत्यू
इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावत असताना शॉक लागला आणि 23 वर्षीय शिवानी अनिल पाटील या तरुणीचा मृत्यू झाला
तुषार तपासे, झी २४ तास सातारा: पेट्रोल डिझेलच्या वाढत असलेल्या किंमती मुळं प्रत्येक जण आता पर्याय शोधायला लागला आहे. यावर उत्तम पर्याय म्हणजे इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणं. पण थोडं थांबा आणि विचार करा. इलेक्ट्रिक वाहनं घेणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. असाच एक प्रकार साताऱ्याच्या कराड तालुक्यातील म्होप्रे गावात घडला आहे. इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावत असताना शॉक लागला आणि 23 वर्षीय शिवानी अनिल पाटील या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शिवानी पाटील या म्होप्रे गावच्या रहिवाशी होत्या. त्या इलेक्ट्रिक बाईक वापरत असत. दुसऱ्या दिवशी बाहेरगावी जाण्याचं शिवानी पाटील यांचे नियोजन होतं. यासाठी शिवानी पाटील यांनी दुचाकीची बॅटरी तपासून पाहिली. बॅटरीचे पॉईंट कमी होते. त्यामुळे त्यांनी बॅटरी चार्जिंगला लावण्याचे कीट बाहेर काढलं. बॅटरी चार्जिगला लावण्यास सुरुवात केली. मात्र दुर्दैवाने शिवानी यांना शॉक लागला. त्या जखमी झाल्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेहण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान शिवानीचा मृत्यू झाला.
शिवानी पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्यावर भर दिला जातो. मात्र वाहनं घेत असताना इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेविषयी अधिक जागृती निर्माण करण्याची गरज आहे