जुन्नर : एकतर्फी प्रेमातून तरूणाने हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळच्या जांबुत फाटा इथे घडला आहे. या घटनेनंतर परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. तरूणी महाराष्ट्रात सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकतर्फी प्रेमातून तरुणाने हवेत गोळीबार केला. अक्षय दंडवते असं गोळीबार करणाऱ्या तरुणाचं नाव असून अक्षयने तरुणी समोर गोळीबार करून तरुणीला घाबरवण्याचा प्रयत्न केला.राज्यात एकीकडे महिला असुरक्षित असताना एकतर्फी प्रेमातून तरूणाने हवेत गोळीबार केल्याने राज्यातील तरूणाईला कायद्याचा धाक राहिला नाही का? राज्यात खरंच महिला सुरक्षित आहेत का? हाच प्रश्न या निमीत्ताने समोर येताना दिसत असून या सर्व प्रकारानंतर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत फरार अक्षयला चार तासांच्या प्रयत्नानंतर अटक केली आहे.


हिंगणघाट घटना ताजी असताना महाराष्ट्रातील जुन्नरमध्ये असा प्रकार घडतो. हिंगणघाटमध्ये तरूणाने शिक्षिका असलेल्या तरूणीला भररस्त्यात पेट्रोलने जाळलं. यामध्ये त्या तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी विवाहित व्यक्तीला अटक केली असून खटला न्यायालयात सुरू आहे. असं असताना जुन्नरमध्ये असा प्रकार घडला आहे. या तरूणाला पिस्तुल आणि काडतूस कुठून मिळालं? हा देखील प्रश्न उभा राहत आहे. तरूणांवर आणि रोड रोमियोंवरचा पोलिसांचा धाक कमी झाला आहे का? हे या घटनांमधून समोर येतं. 



या तरूणाला अटक करण्यात आली आहे. पण या प्रकाराने तरूणीची नाहक बदनामी होते म्हणून अशा प्रकारच्या घटनांमध्ये तक्रार दाखल केली जात नाही. आणि मग अशा तरूणांच आणखी फावतं. यामुळे तरूणींनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी याविरोधात आवाज उठवला पाहिजे.