Youth suicide for Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा रान पेटवलं असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange fasting) पुन्हा आमरण उपोषणाला बसले असताना परभणीच्या सेलू तालूक्यातील (Parbhani Crime News) राजवाडी गावच्या मराठा तरुणाने आपलं आयुष्य संपविल्याची घटना समोर आली आहे. सगेसोयरेचा अध्यादेश निघत नसल्यानं आपण जीवन यात्रा संपवित असल्याचं या तरुणाने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे, प्रताप शेवाळे (वय २७ वर्षे) असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून स्वतःला गळफास लावून घेत त्यानं जीवन संपवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शासनस्तरावर मराठा आरक्षणाचा (Youth suicide for Maratha Reservation) प्रश्न प्रलंबित असल्याने तो मागील काही दिवसांपासून हताश होता. प्रताप जरांगे पाटलांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभागी होता पण शासन आरक्षणाचा तिढा सोडवत नसल्यानं आपण आत्महत्या करीत असल्याचं तरुणाने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटलंय. प्रताप शेवाळे या तरुणाच्या आत्महत्येनंतर राजवाडी गावाला धक्काच बसल्याचं पहायला मिळतंय.


चिठ्ठीत काय लिहिलंय?


माझ्या मराठा समाजाला पक्के आरक्षण मिळवण्यासाठी सगळे सोयरेचा कायदा पारित होणे आवश्यक आहे. परंतु शासन तो कायदा पारित करत नाही. या कारणामुळे मी आत्महत्या करत आहे, असं प्रताप शेवाळे याने चिठ्ठीत लिहून जगाचा निरोप घेतला.


मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्याच्या आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत पाणी देखील घेणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं, अशी आमची मागणी आहे, ती सरकारने पूर्ण करावी, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी यावेळी मांडली आहे.


दरम्यान, शरीर साथ देईल किंवा नाही हे महत्त्वाचं नाही. समाज महत्त्वाचा आहे. एका जीव गेला तरी चालेल, पण सरकारला कोट्यवधी जिवांची किंमत करावीच लागेल, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावरून देखील जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.