प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कळंबा तुरुंगाच्या ढिसाळ कारभाराची लक्तरं झी २४ तासनं वेशीवर टांगल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आलीय. वाईमध्ये ६ जणांचा खून करणाऱ्या संतोष पोळच्या कोठडीत चक्क पिस्तूल आणि मोबाईल फोन आढळला होता... मात्र ते पिस्तूल बनावट असल्याचा असा दावा जेल अधीक्षकांनी केलाय... या प्रकरणाची चौकशी देखील सुरू झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कळंबा तुरुंगाच्या ढिसाळ कारभाराची लक्तरं झी २४ तासनं वेशीवर टांगल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आलीय. वाईमध्ये ६ जणांचा खून करणाऱ्या संतोष पोळच्या कोठडीत चक्क पिस्तूल आणि मोबाईल फोन आढळला होता... मात्र ते पिस्तूल बनावट असल्याचा असा दावा जेल अधीक्षकांनी केलाय... या प्रकरणाची चौकशी देखील सुरू झालीय.


हा व्हिडिओ आहे संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या वाई हत्याकांडातील प्रमुख आरोपी संतोष पोळ याचा... ६ जणांची निर्घृण हत्या करणारा हा तथाकथित खुनी डॉक्टर सध्या कळंबा जेलमध्ये तुरूंगवास भोगतोय. पण कारागृहात मोबाईल न्यायला बंदी असताना त्यानं मोबाईलवरून चक्क स्वतःचे व्हिडिओ शेअर केलेत. हे सहा व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागलेत. धक्कादायक बाब म्हणजे या व्हिडिओत या खुनी क्रूरकर्म्याच्या हातात चक्क पिस्तूल दिसतंय... एका बॉक्समधून पिस्तूल काढून त्यानं ती कमरेला लावलीय. हे पिस्तूल आणि मोबाईल फोन कसे आले, याची पोलखोलही त्यानं आठ मिनिटांच्या व्हिडिओत केलीय.


कळंबा कारागृह अधिकारी चंद्रकांत आवळे यांनी हे पिस्तूल पोहचवल्याचा दावा पोळनं केलाय. या दाव्यात कितपत तथ्य आहे, याची चौकशी होण्याची गरज आहे. राज्यातील कारागृहांमध्ये नेमकं काय चालतं, हे यानिमित्तानं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय.


याआधी नाशिकच्या कारागृहात कैद्यांपर्यंत मोबाईल फोन कसे पोहचतात, याचा गौप्यस्फोट झी २४ तासनं केला होता. आता सहा व्हिडिओ मोबाईलवर शूट करेपर्यंत कळंबा कारागृहातील यंत्रणा झोपली होती का, असा सवाल उपस्थित होतोय. याच कळंबा कारागृहात नोव्हेंबर २०१५ मध्ये गांजा पार्टी सुरु असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी कारागृह अधीक्षक आणि तुरुंगाधिकारी यांच्यासह तिघा सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आलं होतं. मात्र एवढं होऊनही संतोष पोळसारख्या खतरनाक गुन्हेगारांपर्यंत पिस्तूल आणि मोबाईल फोन कसे पोहचतात, हा मोठा प्रश्नच आहे...