सोलापूर : पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून जयसिंह मोहिते पाटील गटाच्या सहा जिल्हा परिषद सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षादेश डावलून भाजपला मतदान केल्याचा ठपका या सहा जणांवर ठेवण्यात आला आहे. हे सर्व जण मोहिते पाटील गटाचे आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी ही कारवाई केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मंगल वाघमोडे, शीतलदेवी मोहिते पाटील, सुनंदा फुले, अरूण तोडकर, स्वरूपाराणी मोहिते पाटील, गणेश पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र जयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आधी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादीने कारवाई करावी, असे आव्हान जयसिंह मोहिते पाटील यांनी दिले आहे.



राज्यात महाराष्ट्र विकासआघाडी सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडी करण्यात आली आहे. त्याचे परिणाम चांगले आहेत. तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यात सहा पैकी पाच ठिकाणी महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करता आली आहे. विशेष म्हणजे नागपूरमध्ये भाजपला सत्तेतून खाली खेचण्यात आले आहे. 


शिवसेनेतही बंडखोरी, संपर्कप्रमुख पदावरून गच्छंती...


दरम्यान, शिवसेनेतही बंडखोरी झाली. महाविकास आघाडी असताना ही बंडखोरी झाल्याने आघाडीची सत्ता एका ठिकाणी गेली. उमरगा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी राणा पाटील म्हणजेच भाजपचे उमेदवार यांना पाठिंबा दिला. त्या बदल्यात स्वतःच्या पदरात उपाध्यक्ष पद मिळवले. त्यामुळे राणाजगदिशसिंग पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना धक्का देण्याचे काम शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनी केले. तानाजी सावंत यांना मंत्री पद न मिळाल्याने त्यांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात तानाजी सावंत हे शिवसेनेविरोधात असेच वागत राहतील, त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.



शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी करणार्‍या शिवसैनिकांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठकही झाली. बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर देखील उपस्थित होते. पक्षविरोधी कारवाई केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाराज आहेत. त्यामुळे आमदार तानाजी सावंत यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून गच्छंती होण्याची शक्यता. त्यांच्यावर कडक कारवाई हाेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे की, तानाजी सावंत यांनी नेमलेल्या पदाधिकाऱ्यांची थेट हकालपट्टी करण्यात आलीय. सावंतसेना ते चालवत हाेते. उद्धव साहेब बाेलणार नाहीत, ते कृतीतून कारवाई दाखवतात, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच पदाधिकारी पुरुषोत्तम बर्डे यांनी दिली.