राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याची माझ्यासमोर उभं राहायची लायकी नाही- पंकजा मुंडे
पोरीसोरींशी लढण्यासाठी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला इथे मुक्काम ठोकावा लागतो.
बीड: राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही स्थानिक नेत्याची माझ्यासमोर उभे राहण्याची लायकी नाही, अशी खरमरीत टीका भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. त्या मंगळवारी धारूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर अक्षरश: आगपाखड केली. त्यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्याची खिल्ली उडविली.
राष्ट्रवादीच्या नेत्यांची आपल्यासमोर उभे राहायची हिंमत आणि लायकी नाही. त्यामुळे पोरीसोरींशी लढण्यासाठी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला इथे मुक्काम ठोकावा लागतो, अशा शब्दांत पंकजा यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला.
मात्र, कितीही तयारी करा, मी कोणलाही घाबरत नाही. आगामी निवडणुकांमध्ये विजय आपलाच होणार, असा दावा पंकजा मुंडे यांनी केला.