परळी: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना परळीमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावबहिणींमधील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. कारण, आता धनंजय मुंडे यांनीही सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात पसरवल्या जात असलेल्या वादग्रस्त क्लीपवरून  तक्रार दाखल केली होती. धनंजय मुंडे यांच्या या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी संपुष्टात आला. यावेळी परळी येथील समारोपाच्या भाषणानंतर पंकजा मुंडे व्यासपीठावर भोवळ येऊन कोसळल्या होत्या. या सगळ्या प्रकारानंतर भाजप नेते सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आगपाखड केली होती. गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये अनेकांच्या मोबाईलवर एक क्लीप फिरत आहे. या क्लीपमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे ऐकायला मिळत आहे. ही क्लीप पाहूनच हळव्या स्वभावाच्या पंकजाताईंना चक्कर आल्याचा आरोप धस यांनी केला होता. यानंतर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तसेच राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. 


मात्र, धनंजय मुंडे यांनी माझ्या वक्तव्यात फेरफार करून त्याची क्लीप सोशल मीडियावर फिरवली जात असल्याचे म्हटले होते. या क्लीपमुळे आपली बदनामी होत असून त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. अखेर परळी पोलिसांनी याप्रकरणी  भारतीय दंड संहिता कलम ४६९, ३४ व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क) नुसार गुन्हा दाखल केला आहे.



तत्पूर्वी धनंजय मुंडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले होते. ती व्हायरल क्लीप मूळ भाषण संकलित करत जाणीवपूर्वक दोन दिवस उशिरा पसरवली आहे. भाजपच्या काही ठराविक लोकांकडून मला राजकारणातून संपवण्याचा हा डाव असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते.