शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर: कायम दुष्काळ आणि पाणीटंचाईचे चटके सहन करणाऱ्या लातूर जिल्ह्यात यावर्षी दमदार पाऊस झालाय. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेली मांजरा नदी वाहती झाली आहे. मुळात पावसाळ्याच्या सुरुवातीला मांजरा नदी आणि त्यावरील बॅरेजसमध्ये म्हणावं तसं पाणी आलंच नव्हतं.  मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसांमुळे यावर्षी पहिल्यांदाच मांजरा नदी वाहू लागली आहे. तर मांजरा नदीवर लातूर जिल्ह्यातील वांजरखेडा, पोहरेगाव, नागझरी, धनेगाव सह सहा उच्च पातळी बंधारे अर्थात बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या उच्च पातळी बंधाऱ्याचे काही ठिकाणचे दरवाजे उघडल्यामुळे मांजरा नदी भरभरून वाहू लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना धोका; हवामान खात्याचा इशारा

लातूर जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढवून पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सहा उच्चपातळी बंधारे उभारले होते. त्याचा फायदा आता जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना होणार आहे. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बीड-उस्मानाबाद सीमेवरील मांजरा धरणा दोन वर्षानंतर पहिल्यांदाच उपयुक्त पाणीसाठ्यात आलं आहे. त्यामुळे लातूर शहराचा यावर्षीचा आणि पुढच्या वर्षीचा पाणी प्रश्न मिटला आहे. 

सध्या धरणात जवळपास ८५ दलघमी पाणी असून उपयुक्त पाणीसाठा हा जवळपास ३८ दलघमी असून तो एकून पाण्याच्या २१ टक्के इतका आहे. लातूर शहराला ०७ दिवसाआड पाणी पुरवठा होत असून लवकरच तो तीन दिवसाआड करणार असल्याची माहिती लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी 'झी २४ तास'ला दिली आहे. धरणात पाणी अधिक आलंच तर तो एक दिवसाआड ही होऊ शकतो मात्र लातूरकरांनी धरणात जास्त पाणी आल्यामुळे अधिकचा वापर न करता काटकसरीने करण्याचे आवाहनही महापौरांनी केलं आहे.