Weather News : IMD चा इशारा, देशासोबतच महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची चाहूल; सतर्क राहा!
Maharashtra Weather News : देशातील आणि राज्यातील हवामान अतिशय वेगानं बदलत असून, हे हवामान नेमकं कोणत्या भागासाठी अडचणींचं ठरणार आहे त्यासंदर्भातील सविस्तर वृत्त हवामान विभागानं दिलं आहे.
Maharashtra Weather News : मुंबई आणि कोकण भागामध्ये सध्या तापमानाच चढ उतार होत असले तरीही हवेत उष्मा कायम असल्यामुळं चांगलाच उकाडा जाणवत आहे. चालू आठवड्याचा शेवटही हवामानाच्या काहीशा अशाच स्थितीनं होणार असून, राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाड्याची ही स्थिती अशीच स्थिर राहणार आहे. पण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मात्र इथं अपवाद असतील. कारण या भागांमध्ये काही ठिकाणांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. अमरावती आणि वर्धा येथे वादळी वाऱ्यांसह गारपीटीचा इशारा देत हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामानाचा एकंदर अंदाज पाहता नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा यंत्रणा देताना दिसत आहेत.
हेसुद्धा वाचा : डिसेंबर 2021 मध्येच मॅन्यूफॅक्चरिंग बंद, कोविशील्डच्या वादावरुन सीरम इंस्टीट्यूटची माहिती
दरम्यान, नागपूर शहराला गुरुवारी सकाळच्या सुमारास मुसळधार अवकाळी पावसाने झोडपलं. भर उन्हाळ्यात काळे ढग दाटून आले आणि गुरुवारी सकाळीच या काळ्या ढगांमुळे अंधारमय वातावरण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनतर सोसायट्याच्या वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह शहरात मुसळधार पाऊस झाला. गेल्या तीन दिवसांपासूनच नागपुरात उन्हाळ्यातच पावसाळी वातावरण आहे. सकाळच्या सुमारास झालेल्या या अवकाळी पावसामुळे नोकरदार वर्गाची प्रचंड तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वीज पुरवठा ही खंडीत झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या.