मुंबई : अलिकडे सोशल मीडियाचा गैरवापर होण्याच्या घटनांत वाढ होताना दिसत आहेत. आता तर चक्क खंडणी मागण्यासाठी याचा वापर होत असल्याने पोलिसांपुढे नवे आव्हान उभे राहत आहे. चक्क व्हाटस्अॅपवर व्हिडीओ पाठवून दीड कोटीची खंडणी मागितल्याचा प्रकार मुंबईत घडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका व्यापाऱ्याचे अपहरण करून दीड कोटीच्या खंडणीची मागणी अपहरणकर्त्यांनी व्हाटस्अॅपवर व्हिडीओ पाठवून केलेय. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ६  जणांना अटक केली. आंबोली पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करीत सहा जणांना अटक केलेय. 


अपहरणकर्त्यांनी व्यापाऱ्याला तीन दिवस डांबून ठेवत त्याचा छळ केला. भावेन शहा (३९) या व्यापाऱ्याची पोलिसांनी सुटका केली. भावेन शहा आणि त्यांचे वडील केमिकल विक्री आणि वाहतुकीचा व्यवसाय करतात. या व्यवसायाकरिता अलिकडेच त्यांनी नवीन टँकर खरेदी केला होता. त्यासाठी ते अंधेरी येथील आरटीओ कार्यालयात परवान्यासाठी गेले होते. मात्र, ते घरी परत आले नाही. तसेच त्यांचे मोबाईल बंद होते. याबाबत घरचे चिंतेत होते. त्यांच्या पत्नीने आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.


 दरम्यान, दुसऱ्या दिवशी अपहरणकर्त्यांनी भावेन यांच्याच मोबाईलवरून एक व्हिडीओ क्लीप पाठवून दीड कोटीची खंडणी मागितली. त्याचवेळी कपडे काढून त्यांना मारहाण करीत असल्याच्याही क्लिपही पाठवली. त्यामुळे घरचे खूपच घाबरलेत. तक्रारीची पोलिसांनी तात्काळ दखल घेत एक तपास टीम तयार केली आणि तपासाची सूत्रे हलविलीत.


पोलिसांनी भावेन यांच्या पत्नीला अपहरणकर्त्यांकडून येणारा प्रत्येक कॉल घेण्याचा सल्ला देण्यात आला. दीड कोटीच्या खंडणीची रक्कम तडजोडीनंतर ८२ लाखांवर आली. ही रक्कम घेऊन भावेन यांची पत्नी अंधेरीहून विरार आणि पुन्हा अंधेरी त्यानंतर पुन्हा नालासोपारा असा अपहरणकर्त्यांच्या सांगण्यावरुन प्रवास केला. त्याचवेळी पोलीस साध्या वेशात प्रवास करत होते.


पोलिसांना संशय बळावल्यानंतर अपहरणकर्त्यांपैकी दोघेही तिच्या मागावर होते. हे लक्षात आल्यावर रक्कम देण्याआधीच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु केली. चौकशीत चौघांचा ठावठिकाणा समजला. नालासोपारा येथून चार जणांना ताब्यात घेतले. आणि भावेन यांची सुटका केली. 


पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला अटक केली. यात मोहम्मद शानु मोहम्मद रफीक शेख, संदीप नारायण शर्मा, चंद्रबान छत्रधारी सिंग ऊर्फ ऊधम, अनिल राजेंद्रनाथ पांडे, धीरज इंद्रभान सिंग, मोहम्मद मुन्ना सलीम कबाडी यांचा समावेश आहे.


दरम्यान, खंडणी मिळताच भावेन यांची हत्या करण्याचा अपहणकर्त्यांचा कट होता. तर दुसरीकडे अपहरण केल्यानंतर भावेन यांचे डेबिटकार्ड हिसकावून या टोळीने सुमारे ९० हजारांची रक्कम काढली होती, अशी माहिती आता पुढे येत आहे.