मुंबईतील १० धोकादायक पूल पाडणार, वाहतुकीचे तीनतेरा वाजण्याची शक्यता
अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे आणि महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली होती.
मुंबई: पावसाळा संपल्यानंतर मुंबईतील १० धोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे आगामी काळात मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. दहा धोकादायाक पुलांशिवाय दोन धोकादायक पादचारी पूलही पाडण्यात येतील.
अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे आणि महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली होती. त्यानंतर शहरातील पुलांची पाहणी केली असता अनेक पूल धोकादायक असल्याचे आढळून आले.
पालिकेने केलेल्या एकूण २९६ पुलांच्या संरचनात्मक पाहणी अहवालातून ही माहिती समोर आली होती. त्यानुसार १७८ पुलांच्या दुरूस्तीचे लवकरच टेंडर काढले जाणार आहे. यामध्ये ४८ पुलांची तातडीने महत्वपूर्ण दुरुस्ती केली जाईल. तर ७७ पुलांची किरकोळ दुरूस्ती केली जाणार आहे. ८७ पूल बऱ्या स्थितीत असले तरी त्यांची डागडुजी करण्याची गरज आहे.