12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा अखेर सुटणार? मुख्यमंत्री-राज्यपालांची आज भेट
आमदारांच्या नियुक्तीवरुन महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये संघर्ष
मुंबई : मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीचे नेते आज संध्याकाळी 7.30 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. विधान परिषदेच्या बारा आमदार नियुक्तीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात राज्यपालांना भेटणार आहेत. त्यानुसार महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांना भेटणार असून आज संध्याकाळी साडेसात वाजता ही भेट होणार आहे.
गेल्या जवळपास 9 महिन्यांपासून विधानपरिषदेतील 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीवरुन महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये संघर्ष रंगला आहे. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी सुनावणी करत राज्यपालांना तातडीने आमदारांच्या यादीबाबत निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता.
सुव्यवस्थेसाठी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय असायला हवा. संविधानानं दिलेल्या अधिकारांनुसार राज्यपाल कुणालाही उत्तर देण्यास बांधिल नाहीत. त्यामुळे कोर्ट त्यांना निर्देश देऊ शकत नाही. पण, राज्यपालांनी जबाबदारीचं भान ठेवत तातडीने 12 आमदारांच्या जागांवर निर्णय घ्यावा. अनिश्चित काळासाठी संविधानिक जागा रिकाम्या ठेवता येणार नाहीत, असं कोर्टाने म्हटलं होतं.
गेल्या आठवड्यात राज्यपालांच्या भेटीवरुन नाट्य रंगलं होतं. महाविकास आघाडी सरकारकडून राजभवनाकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीची वेळ मागण्यात आली होती. पण राजभवनाकडून वेळ देण्यात आली नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली. त्यानंतर राजभवनाकडून 1 सप्टेंबरला भेटीसाठी वेळ देण्यात आली.
त्यामुळे आता गेल्या नऊ महिन्यांपासून रखडलेला आमदारांचा मुद्दा मार्गी लागतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.