महाराष्ट्रातून १४५ ट्रेन सोडण्यात येणार
पश्चिम बंगाल व्यतिरिक्त श्रमिक रेल्वेचा मार्ग मोकळा
रामराजे शिंदे, नवी दिल्ली : महाराष्ट्रात अडकून पडलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यात झालेल्या वादानंतर राज्यातून १४५ रेल्वे सोडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यापैकी पश्चिम बंगालसाठी मागितलेल्या ४१ गाड्यांना ममता बॅनर्जी सरकारने चक्रीवादळामुळे परवानगी नाकारली असल्याने त्यांच्यासोबत बोलून तोडगा काढा अशी विनंती रेल्वेने राज्य सरकारला केली आहे.
महाराष्ट्रातून श्रमिकांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी रेल्वे पुरेशा गाड्या देत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यानंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल इरेला पेटले होते. तासाभरात यादी द्या, लगेच व्यवस्था करतो, असे उलट आव्हान त्यांनी ठाकरे सरकारला दिले होते. एवढेच नाही तर रात्री दोन वाजल्यानंतर ट्वीट करून दोन वाजेपर्यंत राज्य सरकार १२५ ट्रेनची यादी देऊ शकले नाही, असा टोलाही लगावला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १४५ ट्रेनची यादी रेल्वे मंत्रालयाला पाठवली असून रेल्वेनेही या ट्रेन सोडण्याची तयारी केली आहे.
अन्य राज्यांचा प्रश्न मिटला असला, तरी पश्चिम बंगालमध्ये ४१ श्रमिक ट्रेन पाठवण्याबाबत मात्र अद्याप अडचणी आहेत. कारण अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालने रेल्वे गाड्यांच्या प्रवेशाला मनाई केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल सरकारसोबत चर्चा करून तोडगा काढा असा सल्ला रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक मजूर अडकून पडले होते, पण रेल्वेने गुजरातमधून अधिक गाड्या सोडल्याचा आरोप होत होता. मजूर रस्त्याने चालत जात असल्यामुळेही केंद्र आणि राज्य सरकारवर टीका होत होती. महाराष्ट्रात चालत जाणाऱ्या मजुरांना एसटीने सीमेपर्यंत सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तर रेल्वेने जाणाऱ्या मजुरांच्या तिकिटाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र रेल्वेने पुरेशा गाड्या दिल्या नाहीत, अशी टीका राज्य सरकारने केल्यानंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि भाजप नेत्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती.