दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर, मागील सहा महिन्यात जवळपास 1500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमाफीच्या घोषणेनंतरही या आत्महत्या झाल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीने दिलासा मिळालाय का असा सवाल उपस्थित होत आहे.


शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या


राज्यात सततचा दुष्काळ, त्यातून उद्भवलेली नापिकी आणि नापिकीमुळं कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या.. या दृष्टचक्रात राज्यातील शेतकरी अडकला होता. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीची मागणी होऊ लागली. विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच सत्तेत असलेल्या शिवसेनेनंही कर्जमाफीची मागणी केली, तर दुसरीकडे कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यातील पहिला शेतकऱ्यांचा संपही झाला.  


दीड लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर


या सगळ्या दबावामुळं 24 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. ऐतिहासिक आणि प्रामाणिक कर्जमाफी असा या कर्जमाफीचा उल्लेख केला गेला. 


आत्महत्या थांबायला हव्या होत्या


खरं तर ही कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला हव्या होत्या, मात्र राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात 2016 साली झालेल्या आत्महत्यांचे आणि यंदाच्या आत्महत्येचे आकडे यात विशेष तफावत नाही.


यावर्षी म्हणजे 2017 साली जून ते नोव्हेंबर या सहा महिन्यांच्या काळात 1497 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर गेल्या वर्षी याच काळात 1563 आत्महत्या झाल्या होत्या.


खरं तर शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतर आपल्यावरील कर्जाचा बोजा उतरेल, या दिलासाने शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त व्हायला हवे होते, मात्र तसं काही घडलं नाही.


कर्जमाफी ऑनलाईन घोळात


जूनमध्ये कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर ही कर्जमाफी ऑनलाईन घोळात अडकली होती. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कमच जमा झाली नव्हती. मात्र डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीतील घोळ दूर करून सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार 537 कोटी रुपये जमा झाले आहेत.


सर्वाधिक आत्महत्या विदर्भात


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील आहेत, त्यांच्याच विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा सर्वाधिक आहे.


विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या - 1240


मराठवाडा - 887


उत्तर महाराष्ट्र - 442


पश्चिम महाराष्ट्र - 89


कोकण - 4


विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावरआहे. यंदा कापसावर आलेल्या बोंड अळीमुळे इथला शेतकरी त्रस्त आहे. याशिवाय सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांची संख्याही विदर्भ मराठवाड्यात जास्त आहे. मात्र या पिकांना भाव मिळत नसल्याने डोक्यावरचं कर्ज कसं फेडायचं या चिंतेत हा शेतकरी होता, तर दुसरीकडे नोव्हेंबरपर्यंत त्याला कर्जमाफीचा लाभही मिळाला नव्हता. त्यामुळे कर्जमाफीच्या घोषणा शेतकरी आत्महत्या कमी करण्यास उपयोगी पडली नाही.


आता प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाल्याने तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील, अशी शक्यता आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठीही सरकारकडून ठोस पावलं उचलली जाण्याची आवश्यकता आहे.