मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसागणिक वाढत आहे. मात्र, असे असताना एक दिलासा देणारी बातमी आहे. आतापर्यंत राज्यभरात १५९३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ७८९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. तसेच काल २०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर आहे. तर गेल्या २४ तासांत सर्वाधिक ३२ बळी गेले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ३७  हजार १५९ नमुन्यांपैकी  १ लाख २६ हजार ३७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ९९१५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६२ हजार ८६० लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ८१० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.



काल राज्यात ३२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४३२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईचे २६, तर पुणे शहरातील ३ आहेत. या शिवाय सोलापूर शहरात १, औरंगाबाद शहरात १ आणि पनवेल शहरात १ मृत्यू झाला आहे.


बुधावारी झालेल्या मृत्यूंपैकी २५ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या ३२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.  या ३२ रुग्णांपैकी १८ जणांमध्ये (५६ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत, असे त्यांनी सांगितले.