मुंबई : इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ,  टायरच्या तसंच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या (The Maharashtra State Road Transport Corporation) तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली आहे. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच 17.17 टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

25 ऑक्टोबर म्हणजे आज मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार असून किमान 5 रूपयाने वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने (MSRTC) दिली आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर 5 ते 10 रूपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.


गेल्या 3 वर्षात इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटलं आहे. 


नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच 6 किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ 5 रुपयाच्या पटीत असून 25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. 


25 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकिट आकारणी केली जाणार आहे. तसंच ज्या प्रवाशाने आगाऊ आरक्षण केलं आहे अशा प्रवाशांकडून वाहक सुधारीत तिकिटाच्या रक्कमेची आकारणी करतील, असं महामंडळाने स्पष्ट केलं आहे.