Mumbai Local Train News: मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरण ठरलेले आहे. याच गर्दीमुळं एका तरुणाचा जीव गेला आहे. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मंगळवारी सकाळी लोकलमधून पडून एका वीस वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. तर, प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गर्दीमुळं लोकलमधून पडून जीव गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुष जतीन दोशी असं मयत तरुणाचे नाव असून तो डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी भागात आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. तो आयआयटीमध्ये शिकत होता. आयुषने मंगळवारी सकाळी 9च्या दरम्यान डोंबिवली रेल्वे स्थानकातून फलाट क्रमांक पाचवरुन सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल पकडली होती. मात्र प्रचंड गर्दी असल्याने त्याला आत जाता आले नाही. त्यामुळं तो दरवाजात आधार घेऊन लोंबकळत प्रवास करत होता. 


डोंबिवली रेल्वे स्थानक सोडल्यानंतर लोकलने वेग घेतला होता. मात्र आतमध्ये प्रवाशांची गर्दी जास्त असल्याने दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांवर त्याचा भार येत होता. आयुषला त्याचा तोल सांभाळता आला नाही. त्यामुळं तो तोल जाऊन डोंबिवली ते कोपर स्थानकादरम्याना रेल्वे मार्गात पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. प्रवाशांनी आरडा ओरडा केला मात्र तोपर्यंत लोकल पुढे निघून गेली होती. 


डोंबिवली लोहमार्ग पोलिस कोपर रेल्वे स्थानकातील कर्मचारी आणि इतर प्रवाशांनी तातडीने जखमी आयुषला कल्याण डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, त्याआधीच आयुषचा मृत्यू झाला होता. तरुणाच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. आयुषच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. 


दरम्यान, लोकलमधून पडून मरण पावणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षभरात 500 हून अधिक प्रवासी डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून पडून मरण पावले आहेत. तर, हजारहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. आणखी किती दिवस प्रवाशांना अशा पद्धतीने प्रवास करावा लागणार आहे, असा सवाल प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.