मुंबई: शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. गेल्या काही दिवपासून महाराष्ट्रापासून दोन हजार किलोमीटर लांब गुवाहटीत बंडखोर आमदार तळ ठोकून होते. मात्र राज्यातील सत्तेची चक्रं वेगाने फिरल्यानंतर बंडखोर आमदार महाराष्ट्रात परतणार आहेत. बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदार मुंबईत येणार आहेत. या आमदारांच्या संरक्षणासाठी 2000 सीआरपीएफ जवान मुंबईत दाखल झाले आहेत. तत्पूर्वी सायंकाळपर्यंत शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यामध्ये दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांकडून मोठी खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रातून गोव्यात जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आलाय. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे. उद्या एकनाथ शिंदे गट मुंबईत येणार आहे . कायदा आणि सुव्यवस्था मुंबईत बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. 


गुवाहाटी सोडताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा दावा केला आहे. दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. उद्या आम्ही मुंबईला पोहोचणार, बहुमत चाचणीत सहभागी होणार आणि पुढची प्रक्रियाही आम्ही करणार आहोत. आम्ही सर्व 50 आमदार उद्या मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. बहुमत चाचणी झाल्यानंतर आमदारांची बैठक होईल त्यानंतर पुढील रणनिती ठरवू असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.