मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी डॉक्टर, वैद्यकीय सेवेतील सर्व लोक आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. यादरम्यान मुंबईतील जसलोक रुग्णालयातील वैद्यकीय सेवेतील 21 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर रुग्णालयाने आपल्या सर्व सेवा स्थगित केल्या असून केवळ आपातकालीन सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसलोक रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिलपासून रुग्णालयातील कामकाज नियमितपणे सुरु केलं जाईल. 2 आठवड्यांपूर्वी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयात भरती झाला होता. त्या रुग्णावरील इलाजादरम्यान काही स्टाफलादेखील कोरोनाचा संसर्ग झाला, असल्याचं त्यांनी सांगितलं.


भारतात लॉकडाऊन करण्यात आलं असूनही कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या 5289वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 166 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्टात कोरोनाबाधितांची संख्या 1078 सर्वाधिक असून 64 जणांचा मृत्यू झाला आहे.


एकट्या मुंबईत 686 रुग्ण आहेत. मुंबईत अनेक भाग कोरोना हॉटस्पॉट ठरले आहेत. आशियातूल सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये, कुर्ल्यातील झोपडपट्टीमध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत. झोपडपट्टीमध्ये, मुंबईतील अनेक भागात दाटीवाटीने राहणाऱ्या वस्तीत कोरोनाने हातपाय पसरल्याने मुंबईसाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे. 


दरम्यान, उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन परिस्थितीत नागरिकांशी संवाद साधत लोकांना धीर दिला आहे. उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरात राहून कंटाळा आला असेल तरी ते गरजेचं आहे. त्यामुळे नागरिकांनी निराश न होता आपण तंदरुस्त आणि आनंदी कसे राहू, याकडे लक्ष द्यावे. तसेच कोरोनाचा धोका लक्षात घेऊन हृदयविकाराशी संबंधित व्याधी असलेल्यांनी खाण्यावर बंधने ठेवावीत. घरी नियमितपणे व्यायाम करावा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.