मुंबई : देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे. त्यातही मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. महत्त्वाचं म्हणजे रुग्णांची संख्या रोज अधिक पटीने वाढत आहे. त्यामुळे ही बाब चिंताजनक आहे. मुंबईतील वरळी, प्रभादेवी आणि धारावी या तीन ठिकाणी सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. कधीही न थांबणारी मुंबई आज ठप्प आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव येथे वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंता ही वाढल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे आज मुंबईत १० जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ६५ वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची एकूण रूग्ण संख्या ९९३ वर पोहोचली आहे.


आज मुंबईत सर्वाधिक १० जणांचा मृत्यू झाल्याने ही धोक्याची घंटा आहे. मुंबईतील दाटीवाटीची घरं आणि लोकसंख्या यामुळे कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवणं आता महत्त्वाचं झालं आहे. कोरोनाचं मुंबईवर सावट वाढत चाललं आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईत जर कोरोनाचे रुग्ण वेळीच नियंत्रणात आले नाही तर अनेक महिने लॉकडाऊन वाढवावे लागेल. ज्यात देशाचं मोठं आर्थिक नुकसानही होणार आहे.


मुंबईकरांसाठी आता लॉकडाऊनचं पालन करणं आणखी महत्त्वाचं झालं आहे.